मुंबई, दि. १ : रोहा नगरपरिषद हद्दीतील अधिग्रहित मात्र वापरात न आलेली जमीन विशेष बाब म्हणून मूळ संस्थेला परत देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
मंत्रालयात रोहा येथील धार्मिक संस्थेच्या जमीन अधिग्रहणासंदर्भात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी रोहाचे विशेष कार्यकारी अधिकारी अजय एडाके यांच्यासह संबंधित संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, रोहा येथील धार्मिक संस्थेची अधिग्रहित करण्यात आलेली, मात्र अद्याप वापरात न आलेली जमीन विनामूल्य संबंधित वक्फ संस्थेला परत देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा. तसेच सुधारित अधिमूल्य भरण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात याव्यात.
डागीवाला बंदरातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा
बैठकीत भरडखोल येथील डागीवाला बंदरातील प्रलंबित कामांचाही मंत्री आदिती तटकरे यांनी आढावा घेतला. बंदराकडे जाणारा पोहोच रस्ता, जेट्टीची दुरुस्ती तसेच बंदराशी संबंधित अन्य अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून बंदर नागरिकांच्या वापरासाठी खुले करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
मच्छीमारी व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या स्थानिक मच्छीमारांच्या विविध समस्यांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. संबंधित अधिकारी आणि ग्रामस्थ बैठकीस उपस्थित होते.
0000
श्रद्धा मेश्राम/विसंअ
















WhatsApp