‘लोकसंवाद’ अभियानातून गणेशोत्सवात शासकीय योजनांचा जागर – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. १९: गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात शासकीय योजनांची माहिती थेट गणेशभक्तांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘लोकसंवाद’ अभियानाला मुंबईत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या अभियानाच्या माध्यमातून चिंचपोकळी, लालबाग आणि भायखळा परिसरातील विविध गणेश मंडळांमध्ये नागरिकांशी संवाद साधून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, रोजगाराच्या संधी आणि सामाजिक जनजागृती उपक्रमांची माहिती देण्यात आली.

    शुक्रवारी आयोजित या उपक्रमात इतर मागास बहुजन कल्याण विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग, तसेच नशामुक्त महाराष्ट्र आणि नशामुक्त मुंबई अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती गणेशभक्तांना देण्यात आली.

    ओबीसींच्या योजनांची माहिती

    इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत ओबीसी समाज घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती ओबीसी कल्याण विभागाचे मुंबई शहरचे सहायक संचालक रविकिरण नाईक आणि विभागीय माहिती अधिकारी धोंडिराम अर्जुन यांनी दिली. नागरिकांना योजनांची माहिती मिळावी आणि पात्र लाभार्थ्यांना त्यांचा लाभ घेता यावा, या उद्देशाने मार्गदर्शन करण्यात आले.

    एकाच दिवशी ८०० रोजगार मेळावे

    तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत २९ सप्टेंबर २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ८०० रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. ‘पंडित दीनदयाळ रोजगार महाकुंभ महाराष्ट्र रोजगार मेळाव्यां’ची माहिती लोकसंवाद अभियानाच्या माध्यमातून विभागीय संपर्क अधिकारी काशिबाई थोरात यांनी गणेशभक्तांना दिली. मुंबईत आयोजित करण्यात येणाऱ्या १० ठिकाणच्या रोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी होऊन उपलब्ध रोजगार संधींचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यासोबतच उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहितीही त्यांनी दिली.

    नशामुक्त महाराष्ट्रासाठी जनजागृती

    महाराष्ट्रासह मुंबईला नशामुक्त आणि अमली पदार्थमुक्त करण्यासाठी गृह विभाग व शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती नागरिकांना देण्यात आली. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी अभियानाचे सहायक पोलीस निरीक्षक किरण वाघ, पोलीस उपनिरीक्षक मुकुंद जाधव, वरिष्ठ सहायक संचालक दत्तात्रय कोकरे आणि विभागीय संपर्क अधिकारी निलेश तायडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. नशेचे दुष्परिणाम आणि अमली पदार्थांविरोधातील जनजागृतीचा संदेश देत ‘नशामुक्त महाराष्ट्र’च्या घोषणाही देण्यात आल्या.

    गणेश मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग

    चिंचपोकळीतील चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राजन डिचवलकर, उपाध्यक्ष प्रणील पांचाळ, रंगारी बदक चाळ रहिवासी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मंगेश पिपरकर, कार्याध्यक्ष रोहन सावंत, सरचिटणीस राकेश जेजुरकर आणि खजिनदार शंकर साळवी, लालबाग मधील बाल युवक उत्सव मंडळ तेजुकायाचे अध्यक्ष उपेंद्र सावंत, कार्याध्यक्ष प्रभाकर हडकर, चिटणीस गीतेश गवस आणि खजिनदार मनोहर बटवाल, लालबागमधील राजा तेजुकायाचे अध्यक्ष राजेंद्र सातार्डेकर, उपाध्यक्ष अमित वालगुडे, खजिनदार अमोल भाबड आणि उपखजिनदार अमोल सावंत यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि गणेशभक्त या उपक्रमात सहभागी झाले.

    नागरिकांच्या शंकांचे निरसन

    लोकसंवाद अभियानादरम्यान गणेशभक्तांनी विविध शासकीय योजनांबाबत प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया, संपर्क साधण्याची ठिकाणे आणि उपलब्ध सुविधांबाबत मार्गदर्शकांनी नागरिकांना माहिती दिली.

    गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या योजना, रोजगाराच्या संधी आणि सामाजिक जनजागृतीचे संदेश थेट नागरिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या या उपक्रमामुळे नागरिकांना योजनांची माहिती जाणून घेण्याची आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्याची संधी उपलब्ध झाली.

    ०००

    - Advertisement -