विद्यार्थ्यांना केवळ पदवी नव्हे, तर उद्योगाभिमुख कौशल्ये देण्यावर भर- मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई दि.९: महाराष्ट्रातील अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण, केंद्रीकृत प्लेसमेंट सुविधा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित कौशल्यविकास उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञान व रोजगाराच्या संधींसाठी सक्षम करण्यासाठी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी सांगितले.

    मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकास, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जतेच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई) यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्यविकास उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये ISTE Centralized Placement Platform, Centre for Future Skills आणि ISTE-SmartBridge AI Skilling Initiative या उपक्रमांचा समावेश आहे.

    यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ संचालक तथा तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उपसचिव अमोल मुत्याल, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) चे कुलगुरू तथा बौद्धिक संपदा समितीचे अध्यक्ष प्रा अनिरुद्ध पंडित,  मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रविंद्र कुलकर्णी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत,  (एआयसीटीई)चे प्रताप देसाई व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

    मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील युवकांना बदलत्या उद्योगविश्वाच्या गरजांनुसार सक्षम करण्यासाठी शिक्षण, उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्राचा समन्वय अधिक प्रभावीपणे साधणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना केवळ पदवी किंवा पदविका देणे हा शिक्षणाचा अंतिम उद्देश नसून, त्यांना रोजगारक्षम, उद्योगसज्ज आणि भविष्यातील तंत्रज्ञानाच्या संधी व आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम करणे गरजेचे आहे. उद्योगांच्या गरजांशी सुसंगत कौशल्ये विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावीत, यासाठी अभ्यासक्रम, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष उद्योगानुभव यांची सांगड घालण्यात यावी. कौशल्यविकासाच्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्पष्ट, परिणामाभिमुख आणि कालबद्ध रोडमॅप तयार करून त्यानुसार ठोस निर्णय घेण्यात यावेत, असे निर्देशही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

    बैठकीत ISTE Centralized Placement Platform च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार, इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिपच्या संधी एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यांनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच Centre for Future Skillsच्या माध्यमातून भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित प्रशिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची संकल्पना मांडण्यात आली. ISTE-SmartBridge AI Skilling Initiativeच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील प्राथमिक ते प्रगत स्तरावरील कौशल्य प्रशिक्षण देण्याबाबतही सादरीकरण करण्यात आले.

    महाराष्ट्रातील अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांना ‘शिक्षणातून कौशल्य, कौशल्यातून रोजगार आणि रोजगारातून सक्षम भविष्य’ या दिशेने पुढे नेण्यासाठी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांना संस्थात्मक स्वरूप देऊन त्यांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यावर शासनाचा भर असेल असेही मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील म्हणाले यांनी यावेळी सांगितले.

    ००००

    काशीबाई थोरात/विसंअ

    - Advertisement -