विधानसभा लक्षवेधी 

विधानसभा लक्षवेधी 
- Advertisement -


विधानसभा लक्षवेधी 

गृह, आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयातून रुग्णवाहिका उपलब्ध करणार – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई, दि. २४ : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर–महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात वाहन दरीत कोसळून आठ व्यक्तींचा मृत्यू झाला. पोलीस पंचनाम्यानुसार हा अपघात वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे घडला असल्याचे त्यांनी सांगितले.

या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी एक लाख रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. पोलादपूर–महाबळेश्वर मार्गावरील रस्त्याची कामे IRC (Indian Roads Congress) च्या नियमांनुसार सुरू असून, गृह विभाग, आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या समन्वयातून ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत दिली.

कोकण आणि पश्चिम घाटाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या आंबेनळी घाटासंदर्भात सदस्य अमीन पटेल यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यास उत्तर देताना मंत्री श्री. भोसले बोलत होते. यावेळी सदस्य अस्लम शेख आणि सुधीर मुनगंटीवार यांनी चर्चेत सहभाग घेतला.

मंत्री श्री. भोसले म्हणाले की, रायगड जिल्ह्यातील पोलादपूर ते कुंभरोशी या राज्य महामार्गावरील एकूण २४.२ किलोमीटर रस्त्याचे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत हायब्रीड ॲन्युइटी योजनेअंतर्गत प्रगतीपथावर आहे. यापैकी १४ किलोमीटर लांबीच्या ५.५० मीटर रुंदीच्या विद्यमान रस्त्याचे ७.० मीटर रुंदीच्या डांबरीकरणात रूपांतर करण्यात येत असून, दोन्ही बाजूंना प्रत्येकी १.५० मीटर रुंदीच्या बाजूपट्ट्यांची सुविधा दिली जात आहे. तसेच उर्वरित सुमारे १० किलोमीटर लांबीच्या ५.५० ते ७.० मीटर रुंदीच्या रस्त्याचे १०.० मीटर रुंदीचे डांबरीकरण, दोन्ही बाजूंना प्रत्येकी १.० मीटर रुंदीच्या बाजूपट्ट्यांसह करण्यात येत आहे.

तसेच कुंभरोशी ते महाबळेश्वर या मार्गावर ७.० मीटर रुंदीचे डांबरीकरण तसेच दोन्ही बाजूंना प्रत्येकी १.५० मीटर रुंदीच्या बाजूपट्ट्या विकसित करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. ही कामे प्रगतीपथावर असताना सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत राहावा, यासाठी रस्त्यावरील खड्डे वेळोवेळी डांबरीकरणाद्वारे भरून दुरुस्त करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. आंबेनळी घाटातील अपघातस्थळाजवळ रस्त्याची रुंदी सुमारे १४ मीटर असून, रस्त्याच्या कडेला अँटी क्रश बॅरियर, सुरक्षा कठडे, माहिती व दिशादर्शक फलक आदी सुरक्षा साधने स्थापित करण्यात आली आहेत.

पोलादपूर–महाबळेश्वर या प्रगतीपथावरील रस्ते प्रकल्पामध्ये रस्ते सुरक्षा उपाययोजना, अँटी क्रश बॅरियर आणि सुरक्षा कठडे उभारणे, रोड मार्किंग व पेंटिंग करणे तसेच दिशादर्शक फलक बसविणे आदी बाबींचा समावेश आहे. ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येत आहेत. रोड मार्किंग, पेंटिंग आणि दिशादर्शक फलक हे प्रकाश परावर्तित स्वरूपाचे असल्याने रात्रीच्या वेळी, विशेषतः उंचसखल आणि वळणदार रस्त्यांवरून प्रवास करताना वाहनचालकांना मोठी मदत होते, अशी माहितीही मंत्री भोसले यांनी दिली.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ

 

भेसळविरोधी कारवाईला अधिक बळ देण्याबरोबरच राज्यात नवीन प्रयोगशाळा आणि रिक्त पदे भरली जाणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

मुंबई, दि. २४ : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारभाराला अधिक बळकटी देण्यासाठी मनुष्यबळ वाढ, अत्याधुनिक प्रयोगशाळांची उभारणी आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

सदस्य काशीनाथ दाते यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सुधीर मुनगंटीवार, नाना पटोले, अर्जुन खोतकर, अतुल भातखळकर, अनंत (बाळा) नर, आमश्या पाडवी, मिलिंद नरोटे, जितेंद्र आव्हाड, प्रशांत बंब, रईस शेख, अभिजित पाटील, सिद्धार्थ शिरोळे, सुनिल शेळके यांनी सहभाग घेतला.

मंत्री झिरवाळ यांनी सांगितले की, राज्यात दूध, दुग्धजन्य पदार्थ, पिण्याचे पाणी, गूळ, शेंगदाणे, चहा पावडर, खाद्यतेल, गुटखा, तंबाखू, सुगंधित सुपारी, मावा आदी भेसळयुक्त अन्नपदार्थांवर व्यापक कारवाई करण्यात आली आहे.  या कारवाईत सुमारे ११.९३ कोटी रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. तसेच विविध नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आले असून अन्नसुरक्षेसाठी सातत्याने तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. सर्जिकल ग्लोव्हज संदर्भातही कारवाई करून ७४.८५ लाख रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील अन्न व औषध तपासणी प्रयोगशाळांच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र शासनाकडे २७.३० कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली असून त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. प्रयोगशाळांमध्ये आवश्यक अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे मंत्री झिरवाळ यांनी सांगितले.

विभागातील मनुष्यबळाच्या कमतरतेकडे लक्ष वेधत मंत्री झिरवाळ यांनी सांगितले की, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठपुरावा सुरू आहे. औषध निरीक्षकांची २०० पदे मंजूर असताना केवळ ४१ अधिकारी कार्यरत आहेत. केंद्र शासनाच्या निकषांनुसार राज्यात सुमारे १,१०० अन्न सुरक्षा अधिकारी आणि ४०० औषध निरीक्षकांची आवश्यकता आहे. यासाठी नव्या आकृतिबंधाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.

पीपीपी तत्त्वावर २२ मान्यताप्राप्त प्रयोगशाळांशी सामंजस्य करार करण्यात असल्याने तपासणी अहवाल मिळण्याचा कालावधी ९० दिवसांवरून ३० ते ३५ दिवसांपर्यंत कमी झाला आहे. याशिवाय संभाजीनगर, नाशिक, नागपूर आणि रायगड येथे नवीन प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असून उर्वरित कामे पुढील तीन ते सहा महिन्यांत पूर्ण केली जातील, असे त्यांनी सांगितले.

विभागाच्या बळकटीकरणासाठी अधिकाऱ्यांना भाडेतत्वावर वाहने उपलब्ध करून देण्यासह जिल्हास्तरीय कार्यालयांच्या उभारणीचे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. भेसळ, तेलातील मिश्रण, उघड्यावर मांसविक्री तसेच अन्य अनियमित प्रकारांबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री झिरवाळ यांनी सभागृहात सांगितले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध प्राप्त झालेल्या तक्रारींची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

0000

बी.सी.झवर/विसंअ

 

 

 

 

 

 

 



Source link

- Advertisement -