
धुळे, दि. २९ सप्टेंबर, २०२६: राज्य शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ सुलभपणे आणि एकाच ठिकाणी मिळावा, या उद्देशाने पिंपळनेर परिसरातील सामोडे येथील वडारवाडी येथे विमुक्त जाती व भटक्या जमातीतील नागरिकांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानाच्या अनुषंगाने आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिराच्या माध्यमातून विमुक्त जाती व भटक्या जमातीतील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासोबतच आवश्यक दाखले, प्रमाणपत्रे आणि योजनांचा प्रत्यक्ष लाभ उपलब्ध करून देण्यात आला. शासकीय सेवांसाठी नागरिकांना विविध कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजना थेट पोहोचाव्यात, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिंपळनेरचे तहसीलदार अधिकार पेंडारकर यांनी केले. यावेळी साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती उपस्थितांना दिली. तसेच पात्र नागरिकांनी उपलब्ध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
या अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना लाभांचे वितरण करण्यात आले. यामध्ये शिक्षापत्रिका ११, संजय गांधी-श्रावणबाळ योजनेची ६ प्रमाणपत्रे, १०५ उत्पन्न दाखले, २० वय व अधिवास दाखले, ३२ जात प्रमाणपत्रे, १० जन्म दाखले, ५० ई-शिधापत्रिका, १० विवाह नोंदणी प्रमाणपत्रे तसेच ३० दारिद्र्यरेषेची कार्डे वितरित करण्यात आली. याशिवाय विविध शासकीय योजनांसाठी नागरिकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करून शिबिरस्थळी अर्जही स्वीकारण्यात आले.
एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचले. आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि योजनांच्या लाभाबाबत अधिकाऱ्यांकडून थेट मार्गदर्शन मिळाल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. ‘सेवा संकल्प अभियान’ हे शासनाच्या सेवा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम ठरत असल्याचे या शिबिरातून अधोरेखित झाले.
यावेळी सामोडे येथील सरपंच आरती भारुडे, उपसरपंच रावरसाहेब घरटे, संजय पवार, विष्णू पवार, अरुण देवकर, अरुण वाघ, निलेश पवार, पुरवठा तपासणी अधिकारी विशाल कांगणे, ग्राम महसूल अधिकारी जितेंद्र अहिरे, मंडळ अधिकारी रीना चितळारे, भारत देसले, महसूल सहाय्यक यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००

WhatsApp