
धुळे, दि. २९ सप्टेंबर, २०२६: राज्य शासनाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय सर्पदंश जनजागृती दिनानिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे अंतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये सर्पदंश प्रतिबंध व सर्पांविषयी जनजागृतीचा विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना सर्पदंशापासून बचाव, सर्पदंशानंतर घ्यावयाची खबरदारी तसेच सापांविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन याबाबत मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या उपक्रमांतर्गत आश्रमशाळांमधील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना विषारी, निमविषारी व बिनविषारी सापांची ओळख, त्यांची वैशिष्ट्ये, अधिवास, स्वभाव तसेच पर्यावरणातील त्यांचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. सर्पदंशाच्या प्रसंगी घ्यावयाची खबरदारी, आवश्यक प्रथमोपचार आणि तातडीने वैद्यकीय उपचार घेण्याचे महत्त्वही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
साप हा पर्यावरणीय समतोल राखणारा महत्त्वाचा घटक असल्याने सापांविषयी समाजात असलेले गैरसमज, अंधश्रद्धा आणि अनाठायी भीती दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले. शाळा परिसरात किंवा आसपास साप आढळल्यास घाबरून न जाता सुरक्षित अंतर राखावे, सापाला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नये तसेच प्रशिक्षित सर्पमित्र अथवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असे मार्गदर्शन करण्यात आले.
सर्पदंश झाल्यास कोणतेही घरगुती उपचार किंवा अंधश्रद्धेवर आधारित उपाय न करता संबंधित व्यक्तीस शक्य तितक्या लवकर नजीकच्या आरोग्य संस्थेत दाखल करून वैद्यकीय उपचार सुरू करावेत, असा संदेशही विद्यार्थ्यांना देण्यात आला.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत आरोग्य, सुरक्षितता आणि जनजागृतीविषयक उपक्रम प्रभावीपणे पोहोचविण्यावर भर देण्यात येत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये सर्पदंश प्रतिबंध, प्रथमोपचार आणि सापांविषयी योग्य माहिती निर्माण होण्यास मदत झाली.
“सर्पदंश टाळा, सुरक्षित राहा आणि सापांना मारू नका” हा जनजागृतीपर संदेश देत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची जाणीव आणि पर्यावरणाविषयी संवेदनशीलता निर्माण होण्यास मदत होत असल्याचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी सांगितले.
००००

WhatsApp