
बारामती, दि. १२ : शिक्षण हे सर्वात मोठे शस्त्र असून शिक्षक ही राष्ट्राची खरी संपत्ती आहे. बारामती शहर नेहमीच शैक्षणिक व सामाजिक प्रगतीचे केंद्र राहिले आहे. बारामती तालुक्यातील शाळांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी व विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरचे शिक्षण देण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.

पंचायत समितीच्यावतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपसभापती विवेक वळसे पाटील, पंचायत समिती सभापती किरण तावरे, उपसभापती शुभांगी आगवणे, नगराध्यक्ष सचिन सातव, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, गट विकास अधीकारी किशोर माने,तहसीलदार स्वप्नील रावडे,आरोग्य अधिकारी मनोज खोमणे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांवर आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान न देता त्यांच्यामध्ये सत्यनिष्ठा, देशप्रेम आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवावा. पुणे जिल्हा ही शिक्षणाची पंढरी आहे. या समृद्ध शैक्षणिक परंपरेत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शिक्षक हे समाज आणि राष्ट्राचे खरे शिल्पकार असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करण्याचे कार्य ते करतात.
बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे. या शाळांमध्ये शिक्षण घेणारी मुले ही ग्रामीण महाराष्ट्राची खरी ताकद असून त्यांच्या गुणवत्ता आणि क्षमतेला योग्य दिशा देण्याचे काम शिक्षकांनी करावे. महाराष्ट्र ही संत, समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञांची भूमी आहे. राज्यातील अनेक शिक्षकांनी आपल्या कार्यातून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक मिळवला आहे, असेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, राज्य शासनाने शिक्षण आणि शिक्षण क्षेत्राच्या विकासाला नेहमीच अग्रक्रम दिला आहे. बदलत्या काळानुरूप शिक्षकांनी अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षणासोबतच समस्या निराकरण, टीमवर्क आणि मूल्याधारित शिक्षणाची जोड देत त्यांच्यामध्ये सद्गुणांची रुजवणूक करावी. स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने परिस्थितीला सामोरे जाणारी सशक्त पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे.

ग्रामीण भागातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही व जिल्हा परिषद शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी राज्य शासन सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहे. विद्यार्थ्यांनी वाचन करावे, विचार करावा, प्रश्न विचारावेत, स्वतःचे मत तयार करावे आणि अपयशाची भीती बाळगू नये, असा सल्लाही उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी दिला.
शिक्षणामुळे सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडतो. दिवंगत अजितदादांनी नेहमीच महाराष्ट्राच्या तसेच पुणे जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला प्राधान्य दिले. प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत अद्ययावत संगणक कक्ष, ई-लर्निंग सुविधा आणि डिजिटल वर्गखोल्या उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांना आधुनिक अध्यापन पद्धतींचे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
राज्याच्या शिक्षण क्षेत्रात सकारात्मक आणि गुणात्मक बदल घडविण्याचा शासनाचा निर्धार असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी मुख्यमंत्री विज्ञानवारी, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सायन्स सेंटर, समूह शाळा, आदर्श शाळा, दत्तक शाळा, प्रवेशोत्सव, आरोग्य तपासणी, सैनिकी शिक्षण, मोफत गणवेश, निपुण महाराष्ट्र अभियान यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिक्षकांचे प्रश्न, शाळांमधील सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी शासन सदैव तत्पर आहे असे सांगून यावर्षी पुणे जिल्हा परिषदेच्या ६०० शाळा मॉडेल स्कूल करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अन्य मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. बारामती तालुक्यात ६५ जिल्हा परिषद शाळांमध्ये ११ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तालुक्यातील आरटीई अंतर्गत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, मागील व चालू वर्षातील मॉडेल स्कूलच्या कामांची प्रगती, शिक्षक भरती, मिशन ३०० अंतर्गत शाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कामांची माहितीही देण्यात आली.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्य, आजी- माजी लोकप्रतिनिधी, आदर्श शिक्षक, गुणवंत विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००

WhatsApp