
मुंबई, दि. १६ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना तसेच जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना दर्जेदार आणि प्रभावी आरोग्यसेवा उपलब्ध होण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, रुग्णालयांतील पायाभूत सुविधा आणि सर्व आवश्यक सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून द्याव्यात. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेशी संबंधित प्रलंबित प्रश्न वेळ न दवडता मार्गी लावून कामे सुरळीतपणे आणि तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णालयांमधील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा शल्य चिकित्सक, सिंधुदुर्ग येथे आवश्यक एस-२३ आणि एस-२० विशेषज्ञांची रिक्त पदे भरणे, तसेच जिल्ह्यातील रुग्णालयांमधील वर्ग-१ ते वर्ग-४ संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. याशिवाय जिल्हा शल्य चिकित्सक, सिंधुदुर्ग यांच्या ७ सप्टेंबर २०२६ रोजीच्या पत्रात नमूद केल्यानुसार जिल्ह्यातील रुग्णालयांसाठी आवश्यक अनुदान, बांधकामे आणि इतर प्रलंबित विषयांचाही आढावा घेण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक नागरिकांसोबतच मोठ्या प्रमाणात बाहेरून येणारी लोकसंख्या असते. गणेशोत्सवाच्या काळातही मोठ्या संख्येने नागरिक जिल्ह्यात येतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन रुग्णालयांमध्ये आवश्यक मनुष्यबळ आणि सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यामुळे उपलब्ध सुविधांचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार प्राधान्यक्रम निश्चित करावा, अशा सूचना मंत्री राणे यांनी दिल्या.
आरोग्य व्यवस्थेतील प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करून नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देतानाच आरोग्यसेवेबाबत नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण होईल, यासाठी प्रभावीपणे काम करावे, असेही मंत्री राणे यांनी निर्देशित केले.
0000

WhatsApp