सेवा संकल्प अभियानांतर्गत कोठली खुर्द व चौपाळे येथे भटके विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान संपन्न – महासंवाद

    - Advertisement -

    नंदुरबार, दि. २८ सप्टेंबर- सेवा संकल्प अभियानांतर्गत मौजे कोठली खुर्द व चौपाळे येथे ‘राष्ट्रपिता राष्ट्रनेता अभियान – भटके विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ उत्साहात पार पडले. या अभियानाच्या माध्यमातून भटक्या व विमुक्त प्रवर्गातील नागरिकांना विविध शासकीय योजना, दाखले व प्रमाणपत्रांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला.

    कोठली खुर्द येथे आयोजित शिबिरात संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. तसेच उत्पन्नाचा दाखला, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, रहिवासी व अधिवास दाखला, जन्म दाखले, विवाह प्रमाणपत्र यासह विविध 67 दाखले व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या शिबिरातून एकूण 75 नागरिकांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला.

    चौपाळे येथे झालेल्या अभियानात श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, प्रधानमंत्री आवास योजना तसेच इतर योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला. यासोबतच आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड व इतर कागदपत्रे मिळून विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

    याशिवाय शेतकरी महिला प्रमाणपत्रासाठी 12 महिलांचे नोंदणीकरण करण्यात आले. चौपळे येथील अभियानातून एकूण 138 नागरिकांना विविध योजनांचा व शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला.

    दोन्ही ठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शासकीय योजनांचा लाभ आणि आवश्यक कागदपत्रे नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हे अभियान उपयुक्त ठरत आहे.

    00000

    - Advertisement -