‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ४ हजार ५८९ प्रमाणपत्रे व कागदपत्रांचे वितरण – महासंवाद

    - Advertisement -

    • भटके-विमुक्तांच्या दारी शासन

     मुंबई, दि. २९ : विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना आवश्यक ओळखपत्रे व प्रमाणपत्रे सुलभतेने उपलब्ध करून देणे, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच त्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी प्रशासन नागरिकांच्या वस्तीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता विशेष अभियानांतर्गत २७, २८ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ राबविण्यात आले. शिवाय ‘सेवा संकल्प अभियानात आतापर्यंत राज्यभर ४ हजार ५८९ प्रमाणपत्रे व कागदपत्रांचे वितरण करण्यात आल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली.

    या अभियानात केवळ शिबिरे आयोजित करण्यापुरते मर्यादित न राहता भटके-विमुक्त समाजाच्या वस्त्या, तांडे आणि नागरिकांच्या प्रत्यक्ष निवासस्थानी पोहोचून त्यांची माहिती संकलित करणे, त्यांच्या अडचणी जाणून घेणे, शासकीय योजनांची माहिती देणे आणि आवश्यक कागदपत्रे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात आला.

    राज्यभर विशेष शिबिरांना व्यापक प्रतिसाद

    अभियानाच्या नोंदीनुसार २७ सप्टेंबर रोजी ५४ ठिकाणी, तर २८ सप्टेंबर रोजी ४४ ठिकाणी अशा एकूण ९८ ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. लातूर, सातारा, धाराशिव, नांदेड, अहिल्यानगर, अमरावती, सोलापूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, पुणे, जळगाव, नागपूर, सांगली, नंदुरबार, यवतमाळ, नाशिक, अकोला, वर्धा, हिंगोली आदी जिल्ह्यांतील विविध ठिकाणी ही शिबिरे घेण्यात आली.

    ग्रामपंचायत कार्यालये, तहसील कार्यालये, समाजभवन यांसह भटक्या-विमुक्त समाजाच्या वस्त्या आणि तांड्यांमध्येही प्रशासनाने प्रत्यक्ष पोहोचून सेवा उपलब्ध करून दिल्या. वाघी तांडा, नाथ गोसावी वस्ती, वडार वस्ती, गोसावी वस्ती, रामोशी वस्ती, धनगर वस्ती आणि पोखरी तांडा यांसारख्या ठिकाणी विशेष शिबिरे आणि प्रत्यक्ष संपर्क उपक्रम राबविण्यात आले.

    १० जिल्ह्यांत ४ हजार ५८९ प्रमाणपत्रे व कागदपत्रे

    ‘सेवा संकल्प अभियानात आतापर्यंत कॅम्प ट्रॅकरमध्ये उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत १० जिल्ह्यांतील ५७ शिबिरांमधून एकूण ४ हजार ५८९ प्रमाणपत्रे आणि विविध कागदपत्रे नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामध्ये ९९२ जात प्रमाणपत्रे, ७८८ अन्य आवश्यक प्रमाणपत्रे आणि ७१० उत्पन्न दाखले देण्यात आले आहेत.

    तसेच ५८२ शिधापत्रिका, ४८९ आधार कार्ड, ४६४ आयुष्मान भारत कार्ड, २१५ रहिवास प्रमाणपत्रे आणि १४१ अधिवास दाखलेही  देण्यात आले आहेत. याशिवाय ६४ विवाह नोंदणी प्रमाणपत्रे, ६३ नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्रे, ४१ निवडणूक ओळखपत्रे, ३४ जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्रे, ५ दिव्यांग प्रमाणपत्रे आणि एक प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रही देण्यात आल्याची माहिती मंत्री सावे यांनी दिली.

     यवतमाळमध्ये सर्वाधिक १ हजार १४५ प्रमाणपत्रे व कागदपत्रे

    जिल्हानिहाय उपलब्ध आकडेवारीनुसार यवतमाळ जिल्ह्यात सहा शिबिरांमधून सर्वाधिक १ हजार १४५ प्रमाणपत्रे व कागदपत्रे देण्यात आली आहेत. नागपूर जिल्ह्यातील १५ शिबिरांमधून ७८५, नाशिकमधील सात शिबिरांमधून ६९०, धुळे जिल्ह्यातील नऊ शिबिरांमधून ६१५, साताऱ्यातील पाच शिबिरांमधून ५२९ तर जळगावमधील पाच शिबिरांमधून ३६४ प्रमाणपत्रे व कागदपत्रे देण्यात आली आहेत. अमरावती जिल्ह्यात २४०, सांगलीमध्ये १४६, अहिल्यानगरमध्ये ४६ तर गोंदिया जिल्ह्यात २९ प्रमाणपत्रे व कागदपत्रांचे वाटप करण्यात आले.

    वस्ती-वस्तीवर जाऊन कुटुंबांची माहिती संकलित

    ‘सेवा संकल्प अभियान’मध्ये विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या वस्त्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन नागरिकांशी संवाद साधण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुटुंबांच्या भेटी घेऊन घरनिहाय माहिती संकलित केली तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक तपशील नोंदविले. नागरिकांच्या वैयक्तिक अडचणी, आवश्यक कागदपत्रांची स्थिती आणि शासकीय सेवांबाबतच्या गरजा जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला.

    शिबिरे आणि वस्तीभेटीदरम्यान नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती सोप्या भाषेत देण्यात आली. योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, संबंधित प्रमाणपत्रांसाठी कोणती प्रक्रिया करावी आणि उपलब्ध शासकीय सेवांचा लाभ कसा घ्यावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

    अभियानात नागरिकांच्या अर्जांची नोंद, आवश्यक माहितीचे संकलन आणि मार्गदर्शनासोबतच तयार झालेली कागदपत्रे संबंधित वस्त्यांमध्ये जाऊन लाभार्थ्यांना प्रत्यक्ष देण्याची कार्यवाही करण्यात आली. यामुळे भटके-विमुक्त समाजातील नागरिकांना प्रमाणपत्रे आणि कागदपत्रांसाठी वारंवार शासकीय कार्यालयात जाण्याची गरज कमी होऊन सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यास मदत होत आहे.

    000

    धोंडिराम अर्जुन/विसंअ

     

    - Advertisement -