▶️ फटाका दुर्घटनेची सखोल चौकशी करा; दोषींवर कठोर कारवाई करा
▶️ दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांप्रती पालकमंत्र्यांकडून सहवेदना व्यक्त
हिंगोली, दि. ६ (जिमाका): हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने आवश्यक ते सर्वोत्तम उपचार मिळावेत, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी सहवेदना व्यक्त केल्या.
नियमांनुसार फटाक्यांची साठवणूक, आवश्यक परवानग्या आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन आदी बाबींची सखोल चौकशी करण्याचे निर्देश हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी दिले. चौकशीत नियमांचे उल्लंघन किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाईचे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्ह्यातील सर्व फटाका विक्री व साठवणूक केंद्रांची तातडीने तपासणी करावी. या ठिकाणी सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी होत असल्याची खात्री करावी, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
०००

WhatsApp