
नवी दिल्ली, दि. ७ : शहरांमधील वायू प्रदूषणाला आळा घालून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या प्रभावी उपाययोजनांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२६’ अंतर्गत महाराष्ट्रातील अमरावती शहराला तृतीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार, तर नाशिक महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक ७ ला वॉर्डस्तरीय सर्वेक्षणात तृतीय क्रमांक मिळाला आहे. अमरावतीला २५ लाख रुपये, तर नाशिकच्या वॉर्ड क्रमांक ७ ला ३० लाख रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
नवी दिल्ली येथील इंदिरा पर्यावरण भवनातील गंगा सभागृहात आयोजित राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कार सोहळ्यात हा गौरव करण्यात आला. राष्ट्रीय हरित अधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमास हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाचे अध्यक्ष राजेश वर्मा, पर्यावरण सचिव तन्मय कुमार, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष डॉ. अमनदीप गर्ग यांच्यासह केंद्र व राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अमरावती मनपाची उल्लेखनीय कामगिरी
हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ३ ते १० लाख लोकसंख्या गटात अमरावती शहराने राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांक पटकावला. यासाठी शहराला २५ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी आणि आयुक्त डॉ. मंगेश गोंदवले यांनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.
नाशिकच्या वॉर्ड क्रमांक ७ चा राष्ट्रीय गौरव
वॉर्डस्तरीय स्वच्छ वायू सर्वेक्षणात ३० हजारांहून अधिक लोकसंख्या गटात नाशिक महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक ७ ने राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांक मिळविला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वॉर्डला ३० लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, उपायुक्त डाॅ. संगिता नांदूरकर यांच्यासह प्रतिनिधींनी पुरस्कार स्वीकारला.
स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२६’ मधील राज्यस्तरीय कामगिरीसाठी महाराष्ट्रातील पुणे येथील वॉर्ड क्रमांक ४ व ७ आणि अमरावती येथील वॉर्ड क्रमांक १२ यांची निवड करण्यात आली आहे. या वॉर्डमध्ये हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि वायू प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यासाठी राज्य शासनामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, या वॉर्डना विशेष सन्मानित करण्यात येणार आहे.
देशातील उत्कृष्ट शहरांचाही गौरव
१० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या गटात उत्तर प्रदेशातील लखनौने प्रथम, मध्य प्रदेशातील इंदूरने द्वितीय, तर जबलपूरने तृतीय क्रमांक मिळविला. ३ ते १० लाख लोकसंख्या गटात ओडिशातील राऊरकेला प्रथम, तर फिरोजाबाद आणि गुंटूर यांनी संयुक्तपणे द्वितीय क्रमांक मिळविला. तीन लाखांपेक्षा कमी लोकसंख्या गटात कलिंग नगर, अंगुल आणि तालचेर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला.
राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांना एकूण ५ कोटी २५ लाख रुपये, तर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वॉर्डना २ कोटी ७० लाख रुपयांची पारितोषिके प्रदान करण्यात आली. ही पारितोषिकाची रक्कम संबंधित शहरांमध्ये वायू प्रदूषण नियंत्रण, हवेची गुणवत्ता सुधारणा आणि स्वच्छ वायूसाठीच्या विविध उपाययोजनांसाठी वापरण्यात येणार आहे.
00000000
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

WhatsApp