‘लोककलेतील श्री गणेश’मधून राज्याबाहेर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जागर – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. ९ : गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त महाराष्ट्राची समृद्ध लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वैभव राज्याच्या सीमांपलीकडे पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘लोककलेतील श्री गणेश’ आणि ‘महा गणेशोत्सव – महाराष्ट्राचा राज्य उत्सव’ अंतर्गत देशातील विविध शहरांमध्ये विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. चेन्नई, सिल्वासा, कोलकाता आणि हैदराबाद येथे सप्टेंबर महिन्यात हे कार्यक्रम होणार आहेत.

    देहरादून येथे 16 सप्टेंबर रोजी सायं. 6 वाजता इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी येथे ‘लोककलेतील श्रीगणेश’ कार्यक्रम होणार आहे. चेन्नई येथे 20 सप्टेंबर रोजी सायं. 6.30 वाजता कृष्णा गणा सभा येथे कार्यक्रम होणार असून, नमन, गण, जाखडी नृत्य, मंगळागौर, आदिवासी नृत्य, धनगरी नृत्य, कोळी नृत्य तसेच जागरण-गोंधळ आदी महाराष्ट्राच्या लोककला प्रकारांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. सिल्वासा येथे 21 सप्टेंबर रोजी सायं. 6 वाजता कला केंद्र, बाल उद्यानासमोर लेझीम, गण-गौळण, बाल्या नृत्य, शास्त्रीय नृत्य आणि विविध गीतांची सुरेल मैफिल रंगणार आहे.

    कोलकाता येथे 22 सप्टेंबर रोजी सायं. 7.30 वाजता महाराष्ट्र निवासातील टिळक हॉल येथे विशेष कार्यक्रम होणार आहे. यात प्रार्थना, गणपती स्तवन, नमन, ओवी, मंगळागौरीची गाणी, भक्तिगीते, गीतरामायण, पारंपरिक लोकसंगीत, देवीचा गोंधळ, कोळीगीते आणि देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. तर हैदराबाद येथे 23 सप्टेंबर रोजी सायं. 6 वाजता भारतीय विद्या भवन, किंगकोटी येथे महाराष्ट्राची भक्तीपरंपरा, लोककला आणि सांस्कृतिक वैभवाचा परिचय करून देणारा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

    महाराष्ट्राच्या लोकजीवनाशी आणि परंपरांशी घट्ट नाते असलेल्या विविध लोककला, लोकसंगीत आणि भक्तिपरंपरांमधून श्री गणेशाविषयीची भक्ती, श्रद्धा तसेच महाराष्ट्राचे सांस्कृतिक भावविश्व प्रभावीपणे व्यक्त होते. या कलाप्रकारांना राज्याबाहेर व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच विविध राज्यांतील रसिकांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची अनुभूती मिळावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

    हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विविध लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन व प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

    या सर्व कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य असून, संबंधित शहरांतील आणि परिसरातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला व सांस्कृतिक परंपरेचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

    0000

    संजय ओरके/विसंअ

    - Advertisement -