
मुंबई दि.९: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी व शैक्षणिक समस्यांचे जलद, पारदर्शक आणि प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी प्रस्तावित ‘Students Grievances Portal’ची कार्यवाही तातडीने गतीमान करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकातदादा पाटील यांनी दिल्या.
मंत्री चंद्रकातदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली Students Grievances Portal (DBATU) संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ संचालक तथा तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ प्रमोद नाईक, उपसचिव अमोल मुत्याल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरेचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना तक्रारींसाठी विविध कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष पाठपुरावा करावा लागू नये, तक्रारींची नोंद, वर्गीकरण, संबंधित विभागाकडून कार्यवाही आणि अंतिम निवारणाची माहिती एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध व्हावी, यासाठी पोर्टलची रचना सुटसुटीत, काटेकोर आणि विद्यार्थीपूरक असावी, असे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच तक्रारींचे योग्य स्वरूपानुसार वर्गीकरण करून त्या संबंधित विभागाकडे वेळेत पाठविणे, प्रत्येक तक्रारीच्या निवारणासाठी जबाबदारी निश्चित करणे आणि विद्यार्थ्यांना तक्रारीची सद्यस्थिती ऑनलाइन पाहता येईल, अशी व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच पोर्टलचे कामकाज सुरळीतपणे चालण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याबरोबरच तक्रारी हाताळण्यासाठी योग्य तज्ज्ञ व्यक्तींची निवड करावी, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना सहजपणे हाताळता येईल आणि तक्रार नोंदविताना कोणतीही अडचण येणार नाही, अशी पोर्टलची वापरकर्ता-अनुकूल रचना असावी. तक्रारींच्या निवारण प्रक्रियेत अनावश्यक विलंब होऊ नये, यासाठी आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना करून पोर्टलचे कामकाज प्रभावीपणे कार्यान्वित करावे, असे निर्देश मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
Students Grievances Portal च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे वेळेत निवारण, प्रशासनातील पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चिती यांना चालना मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करून अधिक सक्षम, पारदर्शक आणि विद्यार्थीपूरक शैक्षणिक व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने हे पोर्टल महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
००००
काशीबाई थोरात/विसंअ

WhatsApp