युवा नेतृत्व संवाद अंतर्गत युवकांना थेट प्रधानमंत्री यांच्यासमोर नव कल्पना मांडण्याची संधी – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. ९ : भारत सरकारच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विकसित भारत युवा नेतृत्व संवाद (व्हीबीवायएलडी) २०२७ या उपक्रमा अंतर्गत १५ ते २९ वयोगटातील युवकांसाठी राज्यभर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. निवड झालेल्या युवकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासमोर नवकल्पना सादर करण्याची तसेच विकसित भारत @2047 च्या उभारणीत थेट योगदान देण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त युवकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन माय भारतचे राज्य संचालक अमित पुंडे यांनी केले.

    मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  यावेळी माय भारत, मुंबईचे उपसंचालक अनुप इंगोले तसेच राष्ट्रीय सेवा योजना महाराष्ट्र राज्य समन्वयक मिलिंद काळे उपस्थित होते.

    राज्य संचालक अमित पुंडे म्हणाले की, या उपक्रमात सहभागी होण्यासाठी माय भारत पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य असून इच्छुक युवकांनी mybharat.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी.

    या उपक्रमाअंतर्गत विकसित भारत प्रश्नमंजूषा स्पर्धा ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत घेण्यात येणार आहे.  विकसित भारत निबंध स्पर्धा (५ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर), निबंध मूल्यांकन (२२ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर), जिल्हा चॅम्पियनशिप (१० ते १६ नोव्हेंबर), राज्यस्तरीय  व्हीबीवायएलडी (१७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर) चे आयोजन करण्यात आले आहे.  राष्ट्रीय व्हीबीवायएलडी संवादचे, नवी दिल्ली (१० जानेवारी ते १२ जानेवारी २०२७) अशा टप्प्यांतून ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

    ग्रामीण ते शहरातील युवकांच्या नेतृत्वगुणांना, नवोन्मेषी विचारांना आणि राष्ट्रनिर्माणातील सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम युवकांना स्थानिक ते राष्ट्रीय स्तरापर्यंत आपले विचार प्रभावीपणे मांडण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.

    या उपक्रमाचा उद्देश विविध सांस्कृतिक, प्रादेशिक आणि सामाजिक पार्श्वभूमीच्या युवकांना एकत्र आणून राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ करणे, विविधतेतील ऐक्याची भावना बळकट करणे आणि देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात युवकांचा सक्रिय सहभाग वाढविणे हा आहे. तसेच लोकगीत, लोकनृत्य, वक्तृत्व, चित्रकला, काव्यलेखन आणि इतर सर्जनशील उपक्रमांद्वारे युवकांच्या नेतृत्वगुणांना व विविध कलागुणांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

    0000

    - Advertisement -