
मुंबई, दि. १० : राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयात खासगी रुग्णालयाच्या समन्वयाने अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांची दिल्ली येथे भेट घेतली. केंद्रीय श्रममंत्र्यांनी या विषयी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, या भेटीमुळे राज्यातील कामगारांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या बैठकीत राज्यातील कामगार रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांचा अधिक प्रभावी वापर करून टाटा एमजीएम सारख्या रुग्णालयाच्या समन्वयातून कॅन्सर रुग्णांवर उपचार करण्याबाबतच्या आरोग्य मंत्र्यांच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली. कोल्हापूरचे कामगार विमा रुग्णालय हस्तांतरित करण्याबाबत तसेच इचलकरंजी येथील ५० खाटांचे रुग्णालय लवकर सुरू करण्याबाबतही केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा झाली. कामगारांना त्यांच्या कार्यक्षेत्राजवळच दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी अशा सुविधा वाढविण्याची गरज असल्याचे मंत्री आबिटकर यांनी सांगितले. यावेळी कामगार विमा रुग्णालयांमध्ये ‘महा-प्लस एआय’ प्रणाली सुरू करण्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी मागणी केली. तसेच प्रोटॉन थेरपीच्या सुविधेबाबतचा पाठपुरावा करण्यात आला.
राज्यातील कामगारांसाठी १८ नवीन कामगार विमा रुग्णालयांना मंजुरी मिळाली असून, त्यापैकी चाकण, जळगाव, बारामती, नाशिक, सातारा, वर्धा, अमरावती सह आठ रुग्णालयांसाठी जागा हस्तांतरित झाली आहे. या रुग्णालयांचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करून ती कामगारांच्या सेवेत आणावीत, तसेच केंद्र शासनाकडील आवश्यक निधी वेळेत उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली. तसेच ज्या ठिकाणी राज्य कामगार विमा रुग्णालये उपलब्ध नाहीत, त्या ठिकाणी भाडेतत्त्वावर रुग्णालये सुरू करण्याबाबतही चर्चा झाली.
महाराष्ट्राचा सार्वजनिक आरोग्य विभाग उत्तम काम करत असून, राज्यातील ईएसआयसी रुग्णालयातील रुग्णसंख्या, सेवा आणि उपचारामध्ये चांगली सुधारणा झाल्याचे केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी नमूद केले. या बैठकीस राज्य कामगार विमा सोसायटीचे आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, संचालक (प्रशासन) सोहम वायाळ आणि संचालक (वैद्यकीय) डॉ. अशोक थोरात उपस्थित होते.
000
श्रीमती सावळे/विसंअ

WhatsApp