
देशाचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तसेच त्यांनी आपल्या कार्यकाळात ‘सेवा परमो धर्मः’ या उक्तीप्रमाणे सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविण्यासाठी केलेल्या अविरत प्रयत्नांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १७ सप्टेंबर २०२६ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
त्याअनुषंगाने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सातारा यांच्या कार्यालयाच्या वतीने कराड तालुक्यातील माळवाडी-मसूर येथील कै. ॲड. दादासाहेब चव्हाण मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे ‘सेवा संकल्प अभियानाचा’ उद्घाटन समारंभ श्री. सुनील जाधव, सहायक आयुक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमास संस्थेचे सचिव श्री. अमित चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रम शिंदे, समाज कल्याण विभागाचे कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह प्रवेश, स्वाधार योजना, स्टँड-अप योजना तसेच जात वैधता प्रमाणपत्र याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सुमारे १५० विद्यार्थी उपस्थित होते.
‘सेवा संकल्प अभियानाच्या’ दुसऱ्या टप्प्यात ‘सेवा माझे योगदान’ उपक्रमांतर्गत दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी कराड येथील स्टेडियम परिसरातील झोपडपट्टीमध्ये ॲट्रॉसिटी अंतर्गत झालेल्या खून प्रकरणातील पीडित कुटुंबाची भेट घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन करण्यात आले. तसेच शासनाकडून देय असलेल्या अर्थसहाय्याची माहिती देऊन त्यासाठी आवश्यक उपलब्ध कागदपत्रे प्राप्त करून घेण्यात आली.

WhatsApp