मोहोळ येथे ‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत गणेशोत्सव मंडळात शासकीय योजनांची जनजागृती – महासंवाद

    - Advertisement -

    सोलापूर, दि. २०: ‘लोकसंवाद २०२६’ या उपक्रमांतर्गत मोहोळ येथील अहिल्यादेवी गणेशोत्सव मंडळात जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने विविध शासकीय योजना, उपक्रम आणि जनकल्याणकारी कार्यक्रमांची माहिती गणेशभक्त व नागरिकांना देण्यात आली.

    शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. यावेळी नागरिकांना शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

    यावेळी ‘लोकसंवाद २०२६ या उपक्रमाचा उद्देश, त्याअंतर्गत राबविण्यात येणारे विविध जनजागृती उपक्रम तसेच शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती देण्यात आली. गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणात लोकसहभाग असलेला उत्सव असल्याने या माध्यमातून शासनाच्या योजना आणि उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

    यावेळी ‘बाप्पा डॉट ओआरजी’ (bappa.org) या संकेतस्थळाचीही माहिती देण्यात आली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तसेच घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांनी आपल्या गणेशोत्सवातील कथा, सामाजिक उपक्रम, देखावे, फोटो आणि व्हिडिओ संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहन माहिती कार्यालयाच्या वतीने सर्वसाधारण सहाय्यक संजय घोडके यांनी केले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, जनजागृती आणि लोकसहभागाचे उपक्रम व्यापक स्तरावर पोहोचविण्यासाठी या उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.

    यावेळी अहिल्यादेवी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अंश गावढे, उपाध्यक्ष रुद्र सोनार, माजी नगरसेवक अतुल गावढे, सचिव नवनाथ माळी, सहसचिव रामू गावढे, खजिनदार ओम गिड्डे, माजी सरपंच अशोक भाऊसाहेब देशमुख, आप्पासाहेब बाळासाहेब देशमुख, प्रकाश शिवाजीराव देशमुख आणि ओंकार देशमुख यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व गणेशभक्त उपस्थित होते.

    ‘लोकसंवाद २०२६’च्या माध्यमातून शासनाच्या योजना, सेवा आणि उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. गणेशोत्सव मंडळांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या मंडळाच्या सामाजिक व जनजागृतीपर उपक्रमांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले.

    ००००

    - Advertisement -