Home News Business उपराष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत २१ मार्चला रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला...

उपराष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत २१ मार्चला रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षान्त सोहळा – मंत्री मंगलप्रभात लोढा – महासंवाद

उपराष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत २१ मार्चला रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षान्त सोहळा – मंत्री मंगलप्रभात लोढा – महासंवाद

मुंबई दि. २० :  रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षान्त सोहळा शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजता लोकभवन येथील दरबार हॉलमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कौशल्याधारित शिक्षणाला चालना देणाऱ्या या विद्यापीठाचा हा पहिलाच दीक्षान्त समारंभ असून राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या कार्यक्रमाला  उपस्थित राहणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री लोढा म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या तरुणांचे सामर्थ्य ओळखले असून त्यांनी देशभरात कौशल्य विकासावर विशेष भर दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यातील कौशल्य विभाग तरुणांसाठी विविध रोजगाराभिमुख उपक्रम राबवत आहे. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ हे उद्योगाभिमुख शिक्षण देणारे अग्रगण्य विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. या विद्यापीठात काळानुरूप  विषयावरील अभ्यासक्रम राबवले जात असून विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा मिळणार आहे. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची जुलै २०२२ मध्ये स्थापना झाली. उच्च दर्जाचे कौशल्यपूर्ण आणि रोजगारक्षम तरुण घडवण्यासाठी, रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी हे विद्यापीठ कार्यरत आहे. स्टार्टअप्स, इनक्युबेशन, रोजगारक्षमता, प्रशिक्षण, समुपदेशन या विशेष बाबींवर विद्यापीठाने लक्ष केंद्रित केले आहे. लवकरच पनवेल येथे विद्यापीठाची भव्य इमारत उभी राहत असून विद्यापीठाची नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात आणि खासगी आस्थापनेत केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.

स्कूल ऑफ सायन्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कौशल्य, व्यवस्थापन आणि वाणिज्य कौशल्य शाळा, डिझाईन आणि सर्जनशील कौशल्ये विद्यालय, अल्प कालावधीचे कौशल्य प्रमाणपत्रे, आंतरराष्ट्रीय नोकऱ्या आणि त्यासंदर्भातील कौशल्य या सगळ्या अभ्यासक्रमांना उद्योगांची जोड देण्यात आली आहे. विद्यापीठाने पर्सिस्टन्ट सिस्टिम, किर्लोस्कर ग्रुप, मायक्रोसॉफ्ट इत्यादी कंपन्यांशी पार्टनरशिप  केलेली आहे. अत्याधुनिक कौशल्याधारित ‘बॅचलर ऑफ डिझाईन’  हा अभ्यासक्रम ‘रुबिक फ्रांस’ या युरोपातील प्रख्यात संस्थेसोबत करार करून चालविण्यात आला आहे. याचप्रमाणे विद्यापीठात आरोग्य सेवेतील वैद्यकीय सहाय्यक कौशल्य अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.


विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात जयंत सहस्रबुद्धे कौशल्याधारित प्रदर्शन

मंत्री लोढा म्हणाले की रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्याच्या निमित्ताने राज्यभरात आयटीआयसाठी सहकार्य करणाऱ्या संस्थांच्या उपक्रमाचे प्रदर्शन या ठिकाणी होणार आहे. भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी जीवन समर्पित करणारे स्व.जयंतराव सहस्रबुद्धे यांचे नाव या प्रदर्शनाला देण्यात आले आहे. तसेच विभागाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप्स योजनेतील लाभार्थी युवतींच्या उपक्रमांचाही या प्रदर्शनात समावेश आहे. विद्यापीठाच्या उल्लेखनीय कौशल्य उपक्रमांसह उद्योगक्षेत्रात आघाडीच्या कंपन्यांचे मिळून एकूण बारा स्टॉल्स या ठिकाणी लागणार आहेत. टोयोटा किर्लोस्कर, अॅटलास, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, दासयू एव्हिएशन तसेच प्रसिद्ध फिल्म निर्माते रॉनी स्क्रूवाला यांचे स्वदेश फाउंडेशन, अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या रूरल डेव्हलपमेंट ट्रस्टचाही यात समावेश आहे, असे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी सांगितले. मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट औद्योगिक संस्थांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या कौशल्यांच्या बळावर आपल्या युवकांना देश-विदेशात रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे ही  मंत्री लोढा यांनी सांगितले.     

यावेळी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर, व्यवसाय प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी उपस्थित होते.

0000

संध्या गरवारे/विसंअ

 

error: Content is protected !!
WhatsApp chat