जागतिक पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला एमटीडीसी अधिकारी-कर्मचाऱ्यांची ‘डेक्कन ओडिसी’ला विशेष भेट – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. २६ : जागतिक पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे महाराष्ट्राची ओळख असलेल्या ‘डेक्कन ओडिसी’ या लक्झरी पर्यटन रेल्वेला विशेष भेट आयोजित करण्यात आली.

    याच दिवशी ‘डेक्कन ओडिसी’ने २०२६-२७ हंगामातील आपल्या पहिल्या सफरीस प्रारंभ केला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ही प्रमुख लक्झरी पर्यटन रेल्वे महाराष्ट्राच्या समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक, भौगोलिक आणि नैसर्गिक वारशाची देश-विदेशातील पर्यटकांना अनुभूती करून देणारे महत्त्वपूर्ण पर्यटन उत्पादन आहे. नव्या हंगामाच्या प्रारंभानिमित्त ‘डेक्कन ओडिसी’ला नवे बाह्य Vinyl Wrap देण्यात आले असून, रेल्वेतील विविध कोचना महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक वारशाशी संबंधित नावे देण्यात आली आहेत. या माध्यमातून पर्यटकांना प्रवासादरम्यान महाराष्ट्राच्या विविध प्रदेशांच्या परंपरा आणि पर्यटनस्थळांशी अधिक जवळून जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

    ‘डेक्कन ओडिसी’मधील पर्यटकांचा अनुभव अधिक माहितीपूर्ण आणि संवादात्मक करण्यासाठी केबिनच्या Keychains तसेच प्रत्येक कोचमध्ये QR Codes उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे QR Codes स्कॅन केल्यानंतर संबंधित कोचला देण्यात आलेल्या प्रदेशाच्या नावामागील इतिहास, संस्कृती, खाद्यपरंपरा, पर्यटनस्थळे, वैशिष्ट्ये आणि वारसा याबाबत माहिती पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पर्यटनस्थळांची माहिती अधिक प्रभावीपणे पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच प्रवास अधिक अनुभवाधारित आणि माहितीपूर्ण करण्याचा हा उपक्रम आहे.

    २०२६-२७ हंगामातील पहिली सफर ‘Maharashtra Splendour’ या लोकप्रिय प्रवास आराखड्यानुसार सुरू झाली असून, या प्रवासात मुंबई, नाशिक, अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, कोल्हापूर, गोवा आणि सावंतवाडी या महत्त्वपूर्ण पर्यटनस्थळांचा समावेश आहे. या प्रवासातून पर्यटकांना महाराष्ट्रातील ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा, अध्यात्मिक पर्यटन, कला, खाद्यसंस्कृती तसेच कोकण किनारपट्टीच्या विविध पर्यटन अनुभवांची अनुभूती मिळणार आहे.

    २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिनाच्या दिवशी ‘डेक्कन ओडिसी’ नाशिक येथे असणार आहे. गोदावरी नदी, कुंभमेळा, प्राचीन मंदिरे तसेच देशातील प्रसिद्ध वाइन पर्यटनासाठी ओळखले जाणारे नाशिक हे महाराष्ट्राच्या वारसा, अध्यात्म आणि आधुनिक पर्यटनाचा अनोखा संगम दर्शविणारे महत्त्वपूर्ण पर्यटनस्थळ आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या दिवशी ‘डेक्कन ओडिसी’चा नाशिकमधील मुक्काम हा महाराष्ट्राच्या या समृद्ध पर्यटन वारशाचे जागतिक पर्यटकांसमोर सादरीकरण करण्याच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा आहे.

    २०२६-२७ हंगामातील पहिल्या सफरीत युनायटेड किंगडममधील पर्यटकांचा मोठा सहभाग असून, त्यासोबत अमेरिका, जपान, कॅनडा आणि मलेशिया येथील पर्यटकही सहभागी झाले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील लक्झरी आणि अनुभवाधारित पर्यटनाला असलेले आंतरराष्ट्रीय आकर्षण अधोरेखित होते.

    पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली, तसेच पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. नीलेश र. गटणे, भा.प्र.से यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या पर्यटन विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.

    एमटीडीसीच्या जबाबदार आणि शाश्वत पर्यटनाच्या धोरणानुसार ‘डेक्कन ओडिसी’चे संचालन केले जाते. त्यामुळे जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होते. उच्च दर्जाच्या पर्यटन अनुभवासोबत पर्यावरणपूरक आणि जबाबदार प्रवासाचा अनुभव पर्यटकांना देण्याच्या एमटीडीसीच्या प्रयत्नांना यामुळे अधिक बळ मिळते.

    एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. नीलेश र. गटणे, भा.प्र.से. म्हणाले,“‘डेक्कन ओडिसी’ हे महाराष्ट्राचा समृद्ध वारसा, संस्कृती, आदरातिथ्य आणि पर्यटन वैविध्य जगासमोर प्रभावीपणे मांडणारे एक वैशिष्ट्यपूर्ण व्यासपीठ आहे. महाराष्ट्राच्या वारशावर आधारित कोचची नावे आणि QR कोडच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली माहिती यामुळे पर्यटकांना महाराष्ट्रातील विविध प्रदेशांशी अधिक सखोल आणि अर्थपूर्ण पद्धतीने जोडता येणार आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या दिवशी ‘डेक्कन ओडिसी’चा नाशिक येथे असलेला मुक्काम हा महाराष्ट्राच्या या महत्त्वपूर्ण पर्यटनस्थळाचे जागतिक पर्यटकांसमोर सादरीकरण करण्याच्या दृष्टीने विशेष आहे. ‘डेक्कन ओडिसी’च्या प्रामुख्याने विजेवर आधारित संचालनातून शाश्वत आणि जबाबदार पर्यटनाप्रती एमटीडीसीची बांधिलकीही अधोरेखित होते.”

    एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. नीलेश र. गटणे, भा.प्र.से. यांनीही यावेळी उपस्थित राहून ‘डेक्कन ओडिसी’च्या विविध सुविधांची पाहणी केली. या उपक्रमाची अंमलबजावणी एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल आणि व्यवसाय विकास विभागाच्या प्रमुख श्रीमती मानसी कोठारे यांच्या समन्वयातून करण्यात आली. या भेटीत मुंबई परिसरातील एमटीडीसीचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.या भेटीदरम्यान एमटीडीसीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘डेक्कन ओडिसी’मधील निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, प्रवाशांसाठी उपलब्ध विविध सुविधा, अंतर्गत सजावट, नवीन स्वरूप तसेच डिजिटल QR माहिती व्यवस्था आणि पर्यटन अनुभवाची संकल्पना यांची पाहणी केली. पर्यटन उत्पादनाचे प्रत्यक्ष अनुभवाधारित ज्ञान अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळाल्याने पर्यटकांशी संवाद साधताना तसेच महाराष्ट्रातील विविध पर्यटन उत्पादनांच्या प्रचार-प्रसारासाठी त्याचा उपयोग होणार आहे.

    नवीन स्वरूप, महाराष्ट्राच्या वारशाशी जोडलेली कोचची नावे, क्यू आर कोडच्या माध्यमातून उपलब्ध होणारी डिजिटल माहिती आणि अनुभवाधारित प्रवास यामुळे ‘डेक्कन ओडिसी’चा २०२६-२७ हंगाम अधिक समृद्ध करण्यात आला आहे. या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती, वारसा, खाद्यपरंपरा आणि शाश्वत पर्यटनाच्या संकल्पना जागतिक पर्यटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या एमटीडीसीच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळणार आहे.

    महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राला अधिक व्यापक आणि जागतिक स्वरूप देण्यासाठी पर्यटन वारसा, सांस्कृतिक अनुभव, लक्झरी पर्यटन, रेल्वे पर्यटन आणि अनुभवाधारित पर्यटनाच्या विविध संधींचा प्रभावीपणे प्रचार करण्यावर एमटीडीसीकडून भर देण्यात येत आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला ‘डेक्कन ओडिसी’च्या २०२६-२७ हंगामातील पहिल्या सफरीच्या प्रारंभाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली ही भेट त्याच दिशेने एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरली.

    ००००

     

    - Advertisement -