
गटविकास अधिकाऱ्यांची आरोग्य शिबिरासह विविध ठिकाणी भेट; स्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा सहभाग
बुलढाणा, दि. 26 (जिमाका) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील संवैधानिक पदावरील कार्यकाळाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’ दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विविध लोकाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामस्तरावर सेवा, स्वच्छता आणि जनजागृतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे.
सेवा संकल्प अभियान तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्राम खेर्डा येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. गटविकास अधिकारी सुरेश तायडे यांनी गावातील आरोग्य शिबिरास भेट देऊन नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालय तसेच गणराज अभ्यासिकेलाही भेट देऊन विविध उपक्रमांचा आढावा घेतला.
अभियानाच्या अनुषंगाने ग्राम खेर्डा येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ग्रामस्थ, आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांनी या मोहिमेत सहभाग घेत स्वच्छतेबाबत जनजागृती केली. अभियानांतर्गत उल्लेखनीय सहभाग व उपक्रमांची दखल घेत संबंधितांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी विस्तार अधिकारी (पंचायत) श्री. राजपूत, आरोग्य विस्तार अधिकारी श्री. पांडे, समुदाय आरोग्य अधिकारी श्री. राठोड, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, ग्राम आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून ग्रामस्तरावर आरोग्य, स्वच्छता, शिक्षण आणि नागरिकाभिमुख सेवांना अधिक बळ देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांनी अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
00000

WhatsApp