कोल्हापुरात २९ व ३० सप्टेंबर रोजी एमएसएसआयडीसीतर्फे सातवी ‘रिव्हर्स बायर-सेलर मीट’ – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. २६ : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार व जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या ‘सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची कार्यक्षमता उन्नती व गतीवर्धन’ (आरएएमपी) कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित (एमएसएसआयडीसी) हे राज्य नोडल संस्थेच्या भूमिकेत कार्यरत आहे. या कार्यक्रमांतर्गत एमएसएसआयडीसी आणि भारतीय निर्यात संघटना महासंघ (एफआयईओ) यांच्या सहकार्याने सातवी ‘रिव्हर्स बायर-सेलर मीट’ अर्थात खरेदीदार-विक्रेता व्यावसायिक संपर्क मेळावा २९ व ३० सप्टेंबर २०२६ रोजी सयाजी हॉटेल, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

    महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना आंतरराष्ट्रीय खरेदीदारांशी थेट व्यावसायिक संपर्क साधता यावा, नवीन निर्यात बाजारपेठांचा शोध घेता यावा तसेच जागतिक बाजारपेठेत प्रवेशाच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संपर्क कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

    या कार्यक्रमात २५ हून अधिक देशांमधील ५० हून अधिक आंतरराष्ट्रीय खरेदीदार सहभागी होण्याची अपेक्षा आहे. आशिया, आफ्रिका, युरोप, उत्तर अमेरिका आणि मध्य पूर्वेतील विविध देशांतील खरेदीदार महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांशी व्यावसायिक संवाद साधणार आहेत. अभियांत्रिकी, वाहनांचे सुटे भाग, ओतकाम उद्योग, कृषी प्रक्रिया, कापड, वस्त्रनिर्मिती, चामड्याच्या वस्तू, हस्तकला तसेच इतर उत्पादन क्षेत्रातील उद्योगांचा या उपक्रमात सहभाग राहणार आहे.

    महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून ४५० हून अधिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग सहभागी होण्याची अपेक्षा असून, दोन दिवसांत ७०० हून अधिक पूर्वनियोजित व्यावसायिक बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. या बैठकींच्या माध्यमातून उद्योजकांना आपली उत्पादने आंतरराष्ट्रीय खरेदीदारांसमोर सादर करण्याबरोबरच जागतिक बाजारपेठेतील मागणी, उत्पादनांच्या आवश्यकता, संभाव्य निर्यात संधी आणि व्यावसायिक भागीदारी याबाबत थेट संवाद साधता येणार आहे.

    निर्यात प्रक्रियेसाठी मार्गदर्शन व सुविधा कक्ष

    सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना निर्यात प्रक्रियेबाबत आवश्यक मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यक्रमस्थळी परदेशी व्यापार महासंचालनालय (डीजीएफटी), बँकिंग संस्था, विमा सेवा प्रदाते, इलेक्ट्रॉनिक वाणिज्य मंच तसेच भारतीय डाक विभागाचे विशेष मार्गदर्शन व सुविधा कक्ष उपलब्ध असतील. निर्यात प्रक्रिया, व्यापार वित्तपुरवठा, विमा, वाहतूक व वितरण व्यवस्था, बाजारपेठ प्रवेश तसेच डिजिटल व्यापार याबाबत सहभागी उद्योजकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

    महाराष्ट्रातील उत्पादनांचे प्रदर्शन

    कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या उत्पादनांचे विशेष प्रदर्शनही आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये चामड्याच्या वस्तू, वस्त्रे, तयार कपडे, हस्तकला तसेच विविध क्षेत्रांतील उत्पादनांचा समावेश असेल.

    या प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची उत्पादन क्षमता, गुणवत्तापूर्ण उत्पादने, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि उद्योजकीय क्षमता आंतरराष्ट्रीय खरेदीदारांसमोर मांडण्याची संधी मिळणार आहे. विशेषतः कोल्हापूर व परिसरातील समृद्ध औद्योगिक क्षमतेला जागतिक बाजारपेठेशी जोडण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

    जागतिक मूल्यसाखळीत सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न

    आरएएमपी कार्यक्रमांतर्गत आयोजित या खरेदीदार-विक्रेता व्यावसायिक संपर्क मेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची निर्यात क्षमता आणि निर्यात सज्जता वाढविणे, आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संपर्क निर्माण करणे तसेच जागतिक मूल्यसाखळ्यांमध्ये राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

    सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनी सक्रिय सहभाग घ्यावा

    कोल्हापूर व परिसरातील जिल्ह्यांमधील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आयुक्त तथा एमएसएसआयडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार यांनी केले आहे.

    आंतरराष्ट्रीय खरेदीदारांशी थेट संवाद साधणे, जागतिक बाजारपेठेच्या गरजा समजून घेणे, नवीन निर्यात बाजारपेठांचा शोध घेणे आणि दीर्घकालीन व्यावसायिक संधी निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचा उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

    ००००

    गजानन पाटील/विसंअ

    - Advertisement -