तरुणांनी टीबीविषयी जनजागृतीचे दूत बनावे; सामाजिक परिवर्तनासाठी पुढाकार घ्यावा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. ३० : क्षयरोग (टीबी) हा केवळ आजार नसून सामाजिक समस्या आहे. टीबीमुक्त मुंबईसाठी शासनाच्या प्रयत्नांसोबत समाजातील प्रत्येक घटकाने, विशेषतः तरुणांनी पुढाकार घेऊन जनजागृतीचे दूत बनावे, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. भवन्स कॉलेज, अंधेरी पश्चिम येथे मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.), बृहन्मुंबई महानगरपालिका आणि भवन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘टीबीमुक्त मुंबई जनजागृती पदयात्रेत’ राज्यपाल सहभागी झाले.

    यावेळी राज्यपालांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, देशाचे भविष्य सरकारी कार्यालयांमध्ये नव्हे, तर शाळा-महाविद्यालये, प्रयोगशाळा आणि तरुणांच्या कार्यातून घडत आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरसोबतच मजबूत आणि संवेदनशील समाज निर्माण करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. चांगल्या समाजाशिवाय व्यक्तीचे चांगले भविष्य घडू शकत नाही, असे त्यांनी नमूद केले.

    टीबीमुक्त समाजासाठी जनजागृती आवश्यक

    टीबी उपचाराने पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र, आजही अनेक नागरिकांमध्ये या आजाराबाबत पुरेशी माहिती नसल्याने तसेच सामाजिक कलंकाच्या भीतीमुळे रुग्ण आजार लपवतात. त्यामुळे वेळेवर तपासणी, योग्य उपचार आणि औषधांचा नियमित वापर याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. सरकारकडून टीबी रुग्णांसाठी तपासणी, औषधे आणि पोषणासह आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्यपालांनी केले.

    टीबीमुक्त मुंबईसाठी केवळ शासकीय यंत्रणेच्या प्रयत्नांवर अवलंबून राहता येणार नाही. विद्यार्थ्यांनी कुटुंब, महाविद्यालय, परिसर आणि समाजात टीबीविषयी सकारात्मक संदेश पोहोचवावा. ‘घाबरू नका, तपासणी करा, उपचार घ्या आणि निरोगी जीवन जगा’ हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.

    संवेदनशील नागरिक घडविण्याची गरज

    समाजाच्या उभारणीसाठी संवेदनशील नागरिकांची आवश्यकता असून, त्यासाठी मोठे आर्थिक योगदान नव्हे तर वेळ, सहानुभूती आणि सामाजिक बांधिलकी महत्वाची आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखाची काळजी घेणे हीच चांगल्या नागरिकाची ओळख आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

    यावेळी त्यांनी तरुणांपुढील पर्यावरण, हवामान बदल, प्लास्टिक आणि वाढता स्क्रीन टाइम यांसारख्या नव्या आव्हानांचाही उल्लेख केला. ‘विकसित भारत’ हा केवळ आर्थिक प्रगतीवर नव्हे, तर नागरिकांची जागरूकता आणि सामाजिक बांधिलकी यावरही आधारित असला पाहिजे. २०४७ च्या विकसित भारताचा मजबूत पाया घालण्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे, असेही त्यांनी सांगितले.

    राज्यपालांनी ‘क्रांती म्हणजे सकारात्मक रूपांतर’ असल्याचे सांगत, एका व्यक्तीचे जीवन बदलणे हीदेखील छोटी क्रांती आहे आणि अशा छोट्या-छोट्या प्रयत्नांतून मोठे सामाजिक परिवर्तन घडते, असे प्रतिपादन केले.

    ‘टीबीमुक्त मुंबई’, ‘नशामुक्त महाराष्ट्र’ आणि लोप पावत चाललेल्या कलांचे जतन – राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे

    राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले की, राज्यपालांनी पदभार स्वीकारल्यानंतर नागरिकांच्या सहभागासाठी ‘टीबीमुक्त मुंबई’, ‘नशामुक्त महाराष्ट्र’ आणि लोप पावत चाललेल्या कलांचे जतन ही तीन प्रमुख क्षेत्रे निश्चित केली आहेत. ‘टीबीमुक्त मुंबई’ मोहिमेचा उद्देश नागरिक, विशेषतः तरुणांना सहभागी करून जनजागृती आणि लोकसहभाग वाढविणे हा आहे.

    टीबी हा प्रतिबंधात्मक आणि उपचाराने पूर्ण बरा होणारा आजार असून, वेळेवर निदान व उपचार अत्यंत महत्वाचे आहेत. तरुणांनी आपल्या कुटुंबात, महाविद्यालयात, परिसरात आणि समाजमाध्यमांद्वारे टीबीविषयी जनजागृती करावी आणि आरोग्य जागृतीचे दूत बनावे, असे डॉ. नारनवरे यांनी आवाहन केले.

    तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे – अभिनेता अपारशक्ती खुराणा

    अभिनेता अपारशक्ती खुराणा यांनी टीबीमुक्त मुंबई उपक्रमाचे कौतुक करताना ‘नशेला नाही म्हणणे’ ही प्रत्येकाची मूलभूत जबाबदारी असल्याचे सांगितले. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम राहिल्यास त्याचा सकारात्मक परिणाम व्यक्तीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर होतो, असे त्यांनी नमूद केले.

    आपल्या वडिलांनी व्यसनांपासून दूर राहण्याची शिकवण दिली आणि त्याचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला, असे सांगत खुराणा यांनी तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून आपल्या भविष्यासाठी योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन केले. मानसिक व शारीरिक स्वास्थ्याचा सकारात्मक परिणाम व्यक्तीच्या कामावर तसेच वैयक्तिक आणि व्यावसायिक नातेसंबंधांवर होतो, असे त्यांनी सांगितले.

    रामधारी सिंह ‘दिनकर’ यांच्या कवितेचा संदर्भ देत, व्यसनामुळे माणसाचा विवेक नष्ट होतो, त्यामुळे तरुणांनी स्वतःचे नुकसान करणाऱ्या पदार्थांपासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले. सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळत असल्याचा आनंद व्यक्त करत, समाज अधिक चांगला आणि जबाबदार बनविण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

    यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, भवन कॉलेजच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. असिफ मुल्ला, भवन्स कॉलेजच्या प्राचार्या प्रा. (डॉ.) सविता पवार, मेघाश्रेय फाउंडेशनच्या संस्थापक सीमा सिंग यांच्यासह शिक्षकवृंद, एन. एस.एस. स्वयंसेवक, एन.सी.सी. कॅडेट्स आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    कार्यक्रमानंतर राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी भवन कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह टीबीमुक्त मुंबई जनजागृती पदयात्रेत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी टीबीविषयी जनजागृती करणारे संदेश देत समाजात आरोग्य जागृती आणि सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश पोहोचविला.

    0000

    - Advertisement -