
धुळे, दि. ३० सप्टेंबर : कुठे वाढ खुंटलेला कापूस… कुठे बोंडातच अडकलेली शेतकऱ्याची आशा… तर कुठे पाण्याअभावी पूर्ण वाढ न झालेला मका. शेतात उभे राहून ही दृश्ये पाहताना नुकसान केवळ पिकांचे नाही, तर वर्षभर राबलेल्या शेतकरी कुटुंबाच्या आशा-अपेक्षांचे असल्याची जाणीव प्रकर्षाने होत होती. अशा दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आज शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे-शेवाडे रस्त्यालगतच्या अमराळे, अरावे तसेच साक्री तालुक्यातील छावडी परिसरातील दुष्काळग्रस्त शेतशिवाराची पाहणी केली.
शेताच्या बांधावर जाऊन त्यांनी कापूस, मका व अन्य पिकांची स्थिती पाहिली. पाऊस न झाल्याने खुंटलेली वाढ, न भरलेली कणसे आणि न फुटलेली कापसाची बोंडे पाहत त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. शेतकऱ्यांनीही पिकांचे नुकसान, पाण्याची चिंता, पशुधनासाठी चारा आणि पुढील काही महिन्यांत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, याबाबतची व्यथा त्यांच्यासमोर मांडली.

यावेळी पालकमंत्री श्री. रावल म्हणाले, “आज शेतकऱ्यांच्या शेतात उभे राहिल्यावर नुकसानीची तीव्रता प्रत्यक्ष दिसत आहे. कापूस चांगला उभा राहू शकला असता; पण पावसाने साथ दिली नाही. मक्याचीही वाढ झाली नाही. आता झालेल्या नुकसानीबरोबरच पुढील दहा ते बारा महिन्यांचा विचार करणे आपल्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा आणि उपलब्ध पाण्याचे नियोजन या बाबींना सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल.”
धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर या चारही तालुक्यांतील शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीच्या कक्षेत समाविष्ट करण्यात आले असल्याचे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. “शेतकऱ्यांनी चिंता करू नये. शासनाकडून उपलब्ध होणारी दुष्काळी मदत पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने वेगाने काम करावे. कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये,” असे त्यांनी स्पष्ट केले.
आता खरी परीक्षा पुढील काळाची असल्याचे नमूद करत त्यांनी पिण्याच्या पाण्याच्या नियोजनावर विशेष भर दिला. “आज सप्टेंबर संपत आहे. पुढील पावसाळा येईपर्यंत जवळपास दहा महिने आपल्याला या परिस्थितीशी सामना करायचा आहे. उन्हाळा अजून पुढे आहे. त्यामुळे आजपासूनच पाण्याचा प्रत्येक थेंब जपावा लागेल. उपलब्ध चारा व इतर साधनसामग्री वाचवावी लागेल. कमी पाण्यात शक्य असलेल्या शेतीचा विचार करावा लागेल,” असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी मदत केवळ जाहीर होऊन चालणार नाही, ती वेळेत त्यांच्या हातात पोहोचली पाहिजे, असे सांगत पालकमंत्री श्री. रावल यांनी पंचनामे व आवश्यक दस्तऐवजीकरणाला गती देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. “नुकसान झाले आहे, हे स्पष्ट आहे. त्यामुळे पंचनामे आणि कागदपत्रांची प्रक्रिया लवकर पूर्ण करा. मदत मिळण्यासाठी कागदोपत्री प्रक्रिया अडथळा ठरू नये. शक्य तितक्या लवकर शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे,” असे त्यांनी सांगितले.
विशेषतः लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची परिस्थिती अधिक कठीण असल्याचे त्यांनी नमूद केले. कमी क्षेत्र, मर्यादित आर्थिक साधने आणि पिकाचे झालेले नुकसान यामुळे अशा कुटुंबांसमोर पुढील काळाचे गंभीर आव्हान उभे आहे. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांकडे केवळ प्रशासकीय बाब म्हणून न पाहता संवेदनशीलतेने पाहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
“शेतकऱ्याने वर्षभराच्या आशेने पेरलेले पीक डोळ्यासमोर करपताना पाहणे ही मोठी वेदना आहे. मात्र या परिस्थितीत निराश होऊन चालणार नाही. पाणी, चारा, रोजगार आणि आवश्यक शासकीय मदतीचे योग्य नियोजन करून आपण हा कठीण काळ पार करू. शासन आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या सोबत राहून आवश्यक ती प्रत्येक शक्य मदत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करेल,” असे पालकमंत्री श्री. रावल यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.
दुष्काळाने शिवारातील हिरवळ हिरावली असली, तरी संकटाशी लढण्याची शेतकऱ्यांची जिद्द कायम आहे. या जिद्दीला वेळेत मिळणारी मदत, पाण्याचे सुयोग्य नियोजन आणि संवेदनशील प्रशासनाची साथ मिळाली, तर पुढील कठीण महिनेही धैर्याने पार करता येतील, असा विश्वास या पाहणीदरम्यान व्यक्त झाला.
यावेळी दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुरज जगताप, शिंदखेड्याचे तहसीलदार नितीनकुमार देवरे, साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे, शिंदखेड्याचे तालुका कृषी अधिकारी सुधीर ईशी, साक्रीचे तालुका कृषी अधिकारी वाय. डी. सोनवणे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, शेतकरी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
००००

WhatsApp