
मुंबई, दि. १ : बांद्रा पूर्व येथील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील टिचर्स कॉलनीसमोरील पादचारी पुलावर लावण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक जाहिरात फलकांच्या प्रकरणाची चौकशी करून विस्तृत अहवाल प्राधान्याने सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या विषयासंदर्भात विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी विधानभवन येथे बैठक घेऊन प्रकरणाचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीस सहायक अनुज्ञप्ती अधीक्षक नम्रता जवळकर, अनुज्ञापन खात्याचे वरिष्ठ निरीक्षक नागेश साटम, निरीक्षक सुनील कातकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता, तक्रारदार तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुंबईतील ‘आवाज इंडिया’ टीव्ही चॅनेलने याबाबत दिलेल्या निवेदनानुसार, बांद्रा पूर्व येथील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील टिचर्स कॉलनीसमोरील पादचारी पुलावर ‘प्रोॲक्टिव्ह इन अँड आऊट अॅडव्हर्टायझिंग प्रा. लि.’ या कंपनीने डिजिटल इलेक्ट्रॉनिक जाहिरात फलक बसविले आहेत. हे फलक पुलाच्या दोन्ही बाजूंना असल्याने पादचाऱ्यांना अडथळा होत आहे. या पुलावरून महिला, लहान मुले आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने ये-जा करतात. मात्र, फलकांमुळे चालण्यासाठी पुरेशी जागा राहत नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. विशेषतः पुलावर चोरी व इतर गैरप्रकारांचा धोका असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. इलेक्ट्रॉनिक फलकांवर सतत बदलणाऱ्या जाहिराती आणि व्हिडिओ दाखविले जात असल्याने वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊ शकते. अतिवर्दळीच्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या मध्यभागी अशा स्वरूपाचा फलक असल्याने सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित कंपनीकडे फलक लावण्याची आवश्यक परवानगी नसल्याचा आरोपही तक्रारदाराने केला आहे.
यावेळी उपाध्यक्ष बनसोडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून फलकांची उभारणी, परवानगी प्रक्रिया, पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर होणारा परिणाम आणि वाहतूक सुरक्षेशी संबंधित बाबींचा विस्तृत आढावा घेतला. पादचारी पुलावरील जाहिरात फलकांमुळे नागरिकांना ये-जा करताना होणारा अडथळा, अपघाताची शक्यता तसेच वाहनचालकांचे लक्ष विचलित होण्याबाबतच्या तक्रारींचीही दखल उपाध्यक्ष बनसोडे यांनी यावेळी घेतली. सामान्य नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा विषय गंभीर आहे. या प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी करून वस्तुनिष्ठ आणि विस्तृत अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश उपाध्यक्ष बनसोडे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
0000

WhatsApp