
मुंबई, दि. १ : खरीप २०२६ हंगाम मधील दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या राज्यातील २६५ तालुक्यांतील शेतकऱ्यांना राज्य शासनाने दिलासा दिला आहे. या तालुक्यांमध्ये खरीप हंगामातील घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदतीच्या कर्जात पुनर्गठन करण्यास मान्यता देण्यात आली असून, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीलाही स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, मदत व पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयानुसार दुष्काळी परिस्थिती घोषित केलेल्या तालुक्यांमध्ये विविध उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन तसेच शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती या सहकार विभागाशी संबंधित उपाययोजनांचा समावेश आहे. त्यानुसार संबंधित तालुक्यांमधील शेतकऱ्यांनी खरीप २०२६ मध्ये घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज मध्यम मुदतीच्या कर्जात पुनर्गठित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच अशा तालुक्यांतील शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या संमतीने कर्जाचे पुनर्गठन
खरीप पीक कर्जाच्या परतफेडीचा कालावधी ३१ मार्च असल्याने, या कालावधीत विहित मुदतीत पीक कर्जाची परतफेड करू न शकणाऱ्या शेतकऱ्यांची संमती घेऊन खरीप हंगामातील पीक कर्जाचे मध्यम मुदतीच्या कर्जात पुनर्गठन करण्यात येणार आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना कर्ज परतफेडीसाठी अतिरिक्त मुदत उपलब्ध होणार आहे. पीक कर्जाच्या पुनर्गठनाची कार्यवाही सर्व बँकांनी ३० एप्रिल २०२७ पर्यंत पूर्ण करावी, असे शासन परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच संबंधित शेतकऱ्यांना पुढील खरीप हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
या शासन परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल. याची सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था तसेच समन्वयक, राज्यस्तरीय बँकर्स समितीद्वारा, बँक ऑफ महाराष्ट्र, शिवाजीनगर, पुणे यांनी आवश्यक दक्षता घ्यावी. दुष्काळी परिस्थिती घोषित २६५ तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी निर्धारित कालमर्यादेत कार्यवाही करावी अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
कोकण विभाग – रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुका, रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड, वेंगुर्ला.
नाशिक विभाग – नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला व देवळा; धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री, शिंदखेडा व शिरपूर; जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर व यावल; नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा व अक्राणी; तर अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर व राहता.
पुणे विभाग- पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर; सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस व मंगळवेढा; सांगली जिल्ह्यातील मिरज, आटपाडी, जत व कवठेमहाकाळ; सातारा जिल्ह्यातील सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा व महाबळेश्वर; तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा व चंदगड
छत्रपती संभाजीनगर विभाग – छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड व फुलंब्री; जालना जिल्ह्यातील बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन व जाफ्राबाद; बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर व वडवणी; लातूर जिल्ह्यातील लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी व जळकोट. धाराशिव जिल्ह्यात धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा व उमरगा; नांदेड जिल्ह्यातील नांदेड, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर व नायगाव; परभणी जिल्ह्यातील पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत व पाथरी; तसेच हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव व वसमत
अमरावती विभाग – बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली, देऊळगावराजा, मेहकर, बुलडाणा, सिंदखेडराजा, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा व नांदुरा; अमरावती जिल्ह्यातील अमरावती, भातुकली, चांदूर रेल्वे, नांदगाव खं., धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगावसुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरूड, मोर्शी, चांदूरबाजार व दर्यापूर; अकोला जिल्ह्यातील अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मुर्तीजापूर, बाळापूर व बार्शीटाकळी, वाशिम जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगळूरपीर, कारंजा व मानोरा; तसेच यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस, आर्णी, नेर, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मारेगाव, झरी-जामणी, केळापूर, घाटंजी व राळेगाव.
नागपूर विभाग – वर्धा जिल्ह्यातील वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट व आष्टी; नागपूर जिल्ह्यातील नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड व नागपूर शहर; भंडारा जिल्ह्यातील भंडारा, पवनी व लाखांदूर; गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा; चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभीड, सिंदेवाही व पोंभुर्णा; तसेच गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली व चामोर्शी तालुका.
००००

WhatsApp