महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये ८.५७ लाख कोटींचे सामंजस्य करार – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. १ : महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये राज्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना देणारे ८ लाख ५७ हजार ४५२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे ६७ सामंजस्य करार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या गुंतवणुकीतून २ लाख ९१ हजार १०९ रोजगारांच्या निर्मितीची अपेक्षा आहे.

    या करारांमध्ये एरोस्पेस अँड डिफेन्स तसेच ऊर्जा आणि क्लीनटेक क्षेत्रातील प्रत्येकी १० करारांचा समावेश आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने डेटा सेंटर्स, माहिती-तंत्रज्ञान आणि सेमिकंडक्टर क्षेत्र आघाडीवर असून या क्षेत्रात ४ लाख १५ हजार ४९० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे.

    ऊर्जा, क्लीनटेक, नवीकरणीय ऊर्जा, बॅटरी एनर्जी आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस क्षेत्रात १ लाख २ हजार ५१९ कोटी रुपयांचे करार झाले आहेत. अंतरिक्ष व संरक्षण क्षेत्रात २७ हजार ९३० कोटी रुपये, तर मेटल्स आणि मायनिंग क्षेत्रात ७५ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे करार करण्यात आले आहेत.

    याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात १२ हजार ६५१ कोटी रुपये, आरोग्य क्षेत्रात ६ हजार ५०० कोटी रुपये, पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स व बांधकाम साहित्य क्षेत्रात १८ हजार ७५१ कोटी रुपये, तसेच स्टील उत्पादन क्षेत्रात ७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झाले आहेत. केमिकल्स, शेती, सेवा आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCC) क्षेत्रात ८ हजार ८०१ कोटी रुपये, तर अन्य विविध क्षेत्रांत १ लाख ८२ हजार ८१० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे.

    महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमध्ये झालेल्या या गुंतवणूक करारांमुळे राज्यातील औद्योगिक विस्तार, आधुनिक तंत्रज्ञानाधारित उद्योग आणि मोठ्या प्रमाणातील रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

    0000

    संजय ओरके/विसंअ

    - Advertisement -