
मुंबई, दि. ५ : पुरातत्व विभाग आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून केली जाणारी राज्य संरक्षित स्मारकाच्या कामांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करण्याचे निर्देश इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले. सांस्कृतिक कार्य विभागाच्या विविध विषयांचा आढावा प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पुरातत्व संचालनालयाने २०२५-२६ आणि २०२६-२७ या आर्थिक वर्षांत जिल्हा नियोजन समिती तसेच विभागाकडे सादर केलेल्या प्रस्तावांच्या सद्यस्थितीबाबत बैठकीत सादरीकरण करण्यात आले. यावेळी संबंधित प्रस्तावांच्या प्रगतीचा, उपलब्ध निधी, एकत्रित निधी आदी मुद्द्यांचा मंत्री ॲड. शेलार यांनी विस्तृत आढावा घेतला. याशिवाय या निधीतून राज्यभरात झालेल्या आणि प्रगतीपथावर असलेल्या कामांचाही आढावा यावेळी घेण्यात आला. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत केल्या जाणाऱ्या राज्य संरक्षित स्मारकांचे जतन, संवर्धन करण्यासाठी केली जाणारी ही कामे गुणवतापूर्ण पद्धतीने आणि सर्व निकषाचे पालन करून केली जावीत, असे निर्देश मंत्री ॲड. शेलार यांनी दिले. या कामाच्या गुणवत्तेबाबत अनेकदा विविध पातळीवर तक्रारी होतात. त्याअनुषंगाने या कामांची त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुळात ही कामे करतानाच गुणवत्तेबाबत पुरेशी खबरदारी बाळगावी. कुंभमेळ्यातील कामांच्या धर्तीवर ही कामेही दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
0000

WhatsApp