महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. ७ : खरीप हंगाम २०२६ मधील दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथक उद्यापासून, ८ ते ११ ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे. केंद्राच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने याबाबत अधिकृत आदेश जारी केला आहे.

    या दौऱ्यामुळे राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील प्रत्यक्ष परिस्थिती, पिकांचे नुकसान, पाणीटंचाई तसेच संबंधित बाबींचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन होणार आहे. केंद्रीय पथकातील अधिकारी प्रत्यक्ष क्षेत्रभेटी घेऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

    तीन पथकांद्वारे विविध भागांची पाहणी
    दुष्काळ पाहणीसाठी ११ सदस्यांचे आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथक नियुक्त करण्यात आले असून, त्यात कृषी, जलसंपदा, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा , अन्न व सार्वजनिक वितरण, पशुसंवर्धन, अर्थ विभाग, नीती आयोग आणि इतर संबंधित विभागांतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पथकाचे नेतृत्व मुक्तानंद अग्रवाल, संयुक्त सचिव (पीक विमा), कृषी व शेतकरी कल्याण विभाग करीत आहेत.

    पाहणीसाठी पथकाचे तीन गट करण्यात आले आहेत. पथक एक पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सोलापूर पुणे जिल्ह्यात तर पथक दोन मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यांना भेट देणार आहे. पथक तीन विदर्भातील नागपूर, यवतमाळ जिल्हा आणि लगतच्या टंचाईग्रस्त भागांची पाहणी करणार आहे.

    केंद्र आणि राज्य यंत्रणांमध्ये समन्वय साधत होणाऱ्या या प्रत्यक्ष पाहणीमुळे दुष्काळी परिस्थितीचे क्षेत्रीय स्तरावरील वास्तव अधिक स्पष्टपणे समोर येण्यास मदत होणार आहे. जिल्हानिहाय अंतिम कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर पथकाच्या भेटींचे नियोजन करण्यात येणार आहे.

    0000

    - Advertisement -