
मुंबई, दि. ७ : महाराष्ट्राला संशोधन, नवोन्मेष आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे जागतिक केंद्र बनविण्याच्या दिशेने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतने आणि पात्र उच्च शिक्षण संस्थांमध्ये संशोधन, नवोन्मेष, तंत्रज्ञान विकास आणि उद्योग-संलग्न शिक्षणाला चालना देण्यासाठी ‘सी.एम. सृष्टी’ (CM-SRISTHI – Scheme for Research, Innovations and Technological Hubs in Higher Education Institutions) योजना जाहीर केली आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत(दादा) पाटील यांनी दिली.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत(दादा) पाटील म्हणाले, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला. ‘विकसित महाराष्ट्र @2047’ या ध्येयाच्या पूर्ततेमध्ये उच्च व तंत्र शिक्षणाची भूमिका अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने ही योजना आखण्यात आली आहे. नवीन तंत्रज्ञान विकसित करणे, उच्च तंत्रज्ञानाचे ज्ञान असलेले कुशल मनुष्यबळ निर्माण करणे आणि शिक्षण-उद्योग-संशोधन याला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा केंद्रबिंदू असणार आहे.
एआय पासून क्वांटम आणि सेमीकंडक्टरपर्यंत संशोधनाला बळ
‘सी.एम. सृष्टी’ अंतर्गत विद्यापीठांमध्ये उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. Deep Tech आणि Frontier Technologies मधील संशोधनाला विशेष प्रोत्साहन देण्यात येणार असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अग्रगण्य संस्था तसेच उद्योगांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करण्यावर भर राहणार आहे. संशोधनातून व्यावसायिक वापरासाठी उपयुक्त तंत्रज्ञान विकसित करण्याचा उद्देश आहे.
या योजनेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), मशीन लर्निंग, डेटा सायन्स, रोबोटिक्स, Generative AI, Agentic AI, Digital Twins, क्वांटम तंत्रज्ञान, ड्रोन, 5G/6G, अंतराळ तंत्रज्ञान, प्रगत साहित्य, सेमीकंडक्टर, EV बॅटरी तंत्रज्ञान, हरित हायड्रोजन आणि अक्षय ऊर्जा यांसारख्या भविष्यातील तंत्रज्ञान क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे.
राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमध्ये स्वतंत्र School of Technology स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये पदव्युत्तर, पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक्टोरल संशोधनाला प्राधान्य देतानाच Applied आणि Translational Research वर विशेष भर राहणार आहे. Incubation Centres आणि Research Parks यांच्याशी एकात्मता साधून उद्योगांच्या गरजांशी सुसंगत कौशल्य आणि प्रशिक्षण विकसित केले जाणार आहे.
महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठांच्या परिसरात नामांकित परदेशी विद्यापीठांच्या शाखा किंवा कॅम्पस स्थापन करण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. Dual Degree, Joint Degree, संयुक्त संशोधन, विद्यार्थी-प्राध्यापक देवाणघेवाण आणि अत्याधुनिक संशोधन सुविधा यामुळे राज्यातील उच्च शिक्षण संस्थांची जागतिक स्पर्धात्मकता वाढविण्याचे उद्दिष्ट आहे
एकाच विद्यापीठाच्या कॅम्पसपुरते शिक्षण मर्यादित न ठेवता अनेक विद्यापीठे, संशोधन संस्था आणि उद्योगांना एका सामायिक शैक्षणिक परिसंस्थेत जोडणाऱ्या Meta University संकल्पनेलाही या योजनेत स्थान देण्यात आले आहे. संसाधनांचे सामायिकीकरण, बहुविषयक शिक्षण, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि संशोधन-नवोन्मेषाला चालना देणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांचे ‘ट्रान्सफॉर्मेशन’
राज्यातील निवडक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये आणि तंत्रनिकेतनांचे अत्याधुनिक रूपांतरण करण्यात येणार आहे. Industry 5.0 च्या गरजांशी सुसंगत अभ्यासक्रम, जागतिक दर्जाच्या Best Practices चा स्वीकार आणि राष्ट्रीय तसेच जागतिक क्रमवारीत संस्थांचा दर्जा उंचावण्यावर भर देण्यात येणार आहे.
संशोधन आणि नवोन्मेष प्रकल्पांना उद्योगांशी जोडण्यासाठी उद्योग क्षेत्राचा सहभाग महत्त्वाचा राहणार आहे. उद्योगांचा आर्थिक सहभाग व्यवहार्य असलेल्या प्रकल्पांमध्ये एकूण प्रकल्प खर्चाच्या किमान २५ टक्के योगदानाची अट ठेवण्यात आली आहे. यामुळे संशोधनाला बाजारपेठेच्या गरजांशी जोडून तंत्रज्ञान हस्तांतरण आणि व्यावसायिक उपयोगाला चालना मिळणार आहे.
‘सी.एम. सृष्टी’ योजनेचा कालावधी २०२६-२७ ते २०३०-३१ असा पाच वर्षांचा राहणार आहे. योजनेंतर्गत प्रकल्पाधारित निधी दिला जाणार असून, संबंधित संस्थांना सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करावा लागणार आहे. प्रकल्पाची आवश्यकता, उद्दिष्टे, निधीचा विनियोग, अपेक्षित निष्पन्न आणि प्रकल्पाची शाश्वतता यांचा डीपीआर मध्ये स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक राहणार आहे.
लोणेरे, मुंबई, पुणे, अमरावतीसह राज्यातील संस्थांमध्ये उत्कृष्टता केंद्रे
योजनेअंतर्गत रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई; डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे; COEP तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे; VJTI, मुंबई; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कराड आणि अमरावती; तसेच श्री गुरुगोविंदसिंहजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था, नांदेड आदी संस्थांमध्ये विविध क्षेत्रांतील उत्कृष्टता केंद्रांची प्रस्तावित उभारणी करण्यात येणार आहे.
या केंद्रांमधून पेटंट, स्टार्टअप, उद्योग-सहकार्य, कौशल्य विकास, रोजगारक्षमता आणि तंत्रज्ञानाधारित उत्पादनांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे. अमरावती येथे AI व Generative AI, रोबोटिक्स व Industry 4.0, सेमीकंडक्टर व VLSI, शाश्वत ऊर्जा व इलेक्ट्रिक मोबिलिटी तसेच स्मार्ट पायाभूत सुविधा अशा क्षेत्रांमध्ये पाच उत्कृष्टता केंद्रे प्रस्तावित आहेत.
संशोधनाला प्राधान्य, उद्योगाशी थेट जोड, जागतिक संस्थांशी सहकार्य आणि भविष्यातील तंत्रज्ञानासाठी कुशल मनुष्यबळ निर्मिती या बाबींचा समन्वय साधणारी ‘सी.एम. सृष्टी’ योजना महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण क्षेत्राला नव्या तंत्रज्ञानाधारित दिशेने नेणारी ठरेल असेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.
शासन निर्णय पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :
GR
000
काशीबाई थोरात/विसंअ

WhatsApp