
नवरात्रोत्सव हा स्त्रीशक्तीचा सन्मान आणि तिच्या सामर्थ्याचा गौरव करणारा उत्सव आहे. महिलांचे हे सामर्थ्य उद्योजकतेच्या माध्यमातून अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विभाग ‘आई’ महिला-केंद्रित धोरण राबवित आहे. महिला उद्योजकतेला प्रोत्साहन, पायाभूत सुविधांचा विकास आणि महिला पर्यटकांची सुरक्षितता या प्रमुख उद्दिष्टांवर आधारित हे धोरण पर्यटन क्षेत्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा देत आहे. या धोरणांतर्गत मान्यताप्राप्त बँकांकडून घेतलेल्या १५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्याची तरतूद आहे. या आर्थिक पाठबळामुळे महिलांना स्वतःचा पर्यटन व्यवसाय उभारण्याची आणि रोजगारनिर्मितीत योगदान देण्याची संधी मिळत आहे.
धोरण महिलासांठी उपयुक्त
पुणे जिल्हयातील वेद कस्तुरी ॲग्रो टुरिझमच्या कल्याणी कराळे म्हणाल्या की, “आई धोरणांतर्गत मिळालेल्या निधीच्या मदतीने आम्ही जुन्नर तालुक्यातील आमच्या गावात एक कॉटेज बांधले आहे. येथे पर्यटक येऊन राहतात. आम्ही त्यांच्यासाठी पारंपरिक पद्धतीच्या जेवणाची सोय करतो. यामुळे त्यांना या भागातील खाद्यसंस्कृतीची माहिती मिळते. तसेच कृषी पर्यटनाचीही पर्यटकांना ओळख होते. शेती कशी केली जाते, विविध भाज्यांचे उत्पादन कसे होते याबाबत आम्ही माहिती देतो. तसेच आंब्याच्या हंगामामध्ये पर्यटकांना बागेमध्ये जाऊन फळांचा आस्वादही घेता येतो. पर्यटन विभागाच्या ‘आई’ धोरणाबाबत मला माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीकडून माहिती मिळाली. यानंतर मी पर्यटन विभागाच्या कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. अधिकाऱ्यांनी मला या धोरणाबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी ‘आई’ धोरणांतर्गत अर्ज केला. ही योजना महिलांसाठी उपयुक्त ठरत आहे. यामुळे महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत. आई योजनेबाबत मी इतर लोकांनाही सांगते, जेणेकरून गरजू व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतील.”
इतर महिलांनाही योजनेबाबत समजावून सांगते
लातूर जिल्हयातील वृंदावन ॲग्रो टुरिझमच्या सुवर्णा चामे म्हणाल्या की, “मला नेहमीच माझ्या गावात नवीन व्यवसाय सुरु करायचा होता. पण आर्थिक अडचणींमुळे हे शक्य होत नव्हते. त्यानंतर गावामधीलच एका व्यक्तीकडून मला पर्यटन विभागाच्या ‘आई’ धोरणाबाबत माहिती मिळाली. पुढील प्रक्रियेसाठी पर्यटन विभागाशी संपर्क साधून मी या धोरणाबाबत जाणून घेतले. पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी निधी मिळवून देण्यात खूप मदत केली. संबंधित अधिकाऱ्यांनी बँकेशी संपर्क साधून याबद्दल माहिती दिली. यातून मिळालेल्या निधीमुळे आज मी स्वतःचे स्वयंपाकघर चालवत आहे. याद्वारे पर्यटकांना पारंपरिक पद्धतीचे जेवण मिळते. ‘आई’ धोरण महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. इतर महिलांनाही मी या योजनेबाबत समजावून सांगते. गेली दोन वर्ष माझा हा व्यवसाय अगदी सुरळीत सुरु आहे.”
आर्थिक पाठबळ मिळाले
नागपूर जिल्हयातील आई जनरल स्टोअरच्या सीमा मढवी म्हणाल्या की “गावामधील एका ओळखीच्या व्यक्तीने मला पर्यटन विभागाच्या आई धोरणाबाबत माहिती दिली होती. यानंतर मी नागपूर येथील पर्यटन विभागाच्या कार्यालयाला भेट दिली. तेथील संबंधित अधिकाऱ्यांनी मला या धोरणाबाबत समजावून सांगितले. निधीसाठी अर्ज करण्यापासून ते बँकेच्या कागदपत्रांच्या प्रक्रियेपर्यंतच्या कामकाजासाठी अधिकाऱ्यांनी खूप मदत केली. धोरणाअंतर्गत मिळालेल्या निधीमधून मी एक जनरल स्टोअर सुरू केले. या दुकानाचे नाव या धोरणाच्या नावावरून ‘आई जनरल स्टोअर’ असेच ठेवले. पर्यटन विभागाकडून वेळेवर व्याजाचा परतावाही मिळतो. यामुळे मला आर्थिक पाठबळ मिळाले आहे.”
युट्युब व्हिडीओद्वारे धोरणाबाबत माहिती मिळाली
ठाणे जिल्हयातील कृषी पर्यटन केंद्राच्या सुचेता पाटील म्हणाल्या की,“आम्ही आमच्या जागेमध्ये लाकडाचा वापर करुन पारंपरिक पद्धतीने घर बांधले आहे. तीन कॉटेज राहण्यासाठी उपलब्ध आहेत. येथे विकेण्डला आम्ही निवासी योग शिबिरे घेतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या ठिकाणी येण्यासाठी पर्यटक आतूर असतात. निसर्गाच्या सानिध्यात राहून योग करण्याचा अनुभव पर्यटकांना घेता येतो. शिवाय पर्यटकांसाठी निवास व्यवस्थाही आहे. खाण्याचीही उत्तम सोय आहे. आंबा, काजू, चिकू यांसारख्या फळांच्या बागा आहेत. शिवाय अंगणातच केल्या जाणाऱ्या शेतातील ताजी भाजी पर्यटकांच्या ताटात असते. आपल्या मातीतील खरा आनंद पर्यटकांना देण्याचा आमचा प्रयत्न असतो. व्यवसायाची उभारणी करत असताना एका युट्युब व्हिडीओद्वारे शासनाच्या ‘आई’ धोरणाबाबत आम्हाला माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे आम्ही पर्यटन विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधला. ज्या ठिकाणी केंद्र उभारले आहे त्या जागेची पाहणीही पर्यटन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. आम्ही बँकेद्वारे व्यवसाय उभारणीसाठी कर्ज घेतले. ‘आई’ धोरणाच्या आधारे आम्हाला शासनाच्या पर्यटन विभागाकडून या व्याजाचा परतावा मिळतो. थेट बँक खात्यामध्ये व्याजाची रक्कम जमा होते. आई धोरणामुळे आम्हाला आर्थिक पाठबळ मिळाले आहे.”
व्याजाचा नियमित परतावा बँक खात्यामध्ये जमा होतो
अमरावती जिल्हयातील पंजाबराव पाटील ढाबाच्या संगीता मांडवगडे म्हणाल्या की, आमचा हॉटेल व्यवसाय सुरु असताना पर्यटकांना अधिक चांगली सेवा मिळावी म्हणून, आम्ही बऱ्याच सुधारणा केल्या. यासाठी लागणार खर्च मोठा होता. त्यासाठी बँकेद्वारे आम्ही कर्ज घेतले. कर्जाची परतफेड करत असताना नियमांनुसार व्याजही नियमित भरणे हा मोठा प्रश्न होता. दरम्यानच्या काळात आई धोरणाबाबत मला माझ्या मित्रांकडून माहिती मिळाली. त्यानुसार मी पर्यटन विभागाच्या कार्यालयाला भेट दिली. संबंधित अधिकाऱ्यांनी मला या धोरणाबाबत मार्गदर्शन केले. याच मार्गदर्शनानुसार ‘आई’ धोरणासाठी अर्ज केला. या धोरणाअंतर्गत व्यवसायासाठी बँकेद्वारे घेतलेल्या व्याजाचा नियमित परतावा आमच्या बँक खात्यामध्ये जमा होतो. अर्ज करण्याच्या प्रक्रियेपासून ते व्याजाची रक्कम बँक खात्यामध्ये जमा होण्यापर्यंतची प्रक्रिया खूप सुरळीत झाली. आम्हाला या विशेष योजनेमुळे आर्थिक बळ मिळाले आहे. मी इतर गावांमधील लोकांनाही या धोरणाविषयी माहिती दिली. काही महिलांनाही आई धोरणाविषयी सविस्तर सांगितले.”
आर्थिक सहाय्य लाभल्यामुळे व्यवसाय सुरळीत
नाशिक जिल्हातील टूर ऑपरेटर उमा देशपांडे म्हणाल्या की“‘करुया भ्रमंती’ नावाने आमचा टूर ऑपरेटरचा व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी मला बँकेकडून कर्ज घेणे गरजेचे होते. कर्जाशी संबंधित बँकेकडे संपर्क साधता तेथील मॅनेजरनेच मला शासनाच्या ‘आई’ धोरणाबाबत माहिती दिली. त्यानुसार पर्यटन विभागाच्या कार्यालयाशी मी संपर्क साधला. त्यानंतर अर्ज कसा करायचा, आवश्यक कागदपत्रे याबाबत त्यांनी मला सविस्तर माहिती दिली. सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर आम्हाला ‘आई’ धोरणाचा लाभ मिळाला. अगदी कमी कालावधीमध्ये प्रक्रिया पूर्ण झाली. बँकेकडून कर्ज मिळाल्यानंतर व्याजाची रक्कम ‘आई’ धोरणांच्या नियमांनुसार आम्हाला नियमित मिळते. शासनाकडून आर्थिक सहाय्य लाभल्यामुळे आमचा व्यवसायही सुरळीत सुरु आहे.”
संध्या गरवारे
विभागीय संपर्क अधिकारी
0000

WhatsApp