राष्ट्रीय कला प्रदर्शनात महाराष्ट्राच्या तीन कलाकारांचा गौरव – महासंवाद

    - Advertisement -

    नवी दिल्ली, दि. २१: ललित कला अकादमीच्या ६५ व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात महाराष्ट्राच्या तीन कलाकारांनी राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला आहे. रमेश विठ्ठल थोरात, सिद्धार्थ शाहजीराव शिंगाडे आणि प्रितम मधुकर देवसकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रतिष्ठित ललित कला अकादमी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात ६५ व्या राष्ट्रीय कला प्रदर्शन आणि तिसऱ्या ‘प्रिंट बिनाले इंडिया’च्या संयुक्त पुरस्कार वितरण सोहळ्यास केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि संस्कृती मंत्रालयाचे सचिव विवेक अग्रवाल उपस्थित होते.

    या सोहळ्यात रमेश विठ्ठल थोरात यांना ‘अनटायटल्ड – II’ या तैलचित्रासाठी, सिद्धार्थ शाहजीराव शिंगाडे यांना ‘ट्रीज’ या मिश्र माध्यमातील कलाकृतीसाठी, तर प्रितम मधुकर देवसकर यांना ‘ऑफ टाइम ॲण्ड द सिटी’ या प्रिंटमेकिंगमधील कलाकृतीसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

    या राष्ट्रीय कला प्रदर्शनासाठी देशातील २७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील २,४९५ कलाकारांच्या एकूण ६,१७५ कलाकृती प्राप्त झाल्या होत्या. त्यातून पहिल्या टप्प्यात निवड समितीने २७० कलाकृतींची प्रदर्शनासाठी निवड केली. त्यानंतर अंतिम निवड प्रक्रियेतून २० उत्कृष्ट कलाकृती राष्ट्रीय पुरस्कारांसाठी निवडण्यात आल्या होत्या. विविध कलामाध्यमांतील त्यांच्या उत्कृष्ट कलाकृतींची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेल्याने महाराष्ट्राच्या कलाप्रतिभेचा गौरव झाला आहे.

    ०००

    महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

    - Advertisement -