वसमतचे हरिद्रा संशोधन केंद्र राज्याच्या हळद उद्योगासाठी महत्त्वपूर्ण – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर   – महासंवाद

    - Advertisement -

    • मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे कौतुक ; संशोधन, प्रक्रिया व मूल्यवर्धनाच्या संधींची घेतली माहिती

     हिंगोली, दि. २ नोव्हेंबर : हळद उत्पादन, संशोधन, प्रक्रिया आणि मूल्यवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळण्यासोबतच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. वसमत येथील मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र हा राज्यातील हळद उद्योगाला गतिमान करणारा महत्त्वपूर्ण प्रकल्प ठरेल. तसेच या केंद्रामुळे जिल्ह्यासह राज्याच्या विकासाला कृषी व औद्योगिक क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

    आरोग्य संवाद यात्रा २०२६ अंतर्गत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन केंद्राच्या कार्याची माहिती घेतली व कौतुक केले. हळद उत्पादनापासून संशोधन, प्रक्रिया, उत्पादनांची गुणवत्ता आणि मूल्यवर्धनापर्यंतच्या विविध बाबींच्या दृष्टीने या केंद्राचे महत्त्व त्यांनी जाणून घेतले.

    या भेटी प्रसंगी केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील, आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, केंद्राचे संचालक लक्ष्मीनारायण मूरक्या, सदाशिव पुंड, रितेश जुजाराव, संचालक आरोग्य सेवा पुणे डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. कांचन वानेरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके आदी उपस्थित होते.

    हळद हे मराठवाड्यातील महत्त्वाचे नगदी पीक असून हिंगोली जिल्ह्यातही या पिकाला विशेष महत्त्व आहे. शेतकऱ्यांना या पिकातून अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी पारंपरिक शेती पद्धतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. सुधारित लागवड तंत्रज्ञान, दर्जेदार बियाणे, संतुलित खत व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रण तसेच काढणीनंतरच्या योग्य प्रक्रियेमुळे हळदीची गुणवत्ता आणि उत्पादनक्षमता वाढविता येईल. यासाठी शेतकऱ्यांना शास्त्रीय मार्गदर्शन व प्रशिक्षण या केंद्रातून उपलब्ध होत आहे असे आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले.

    हळदीवर प्रक्रिया करून विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार केल्यास शेतमालाला अधिक बाजारमूल्य मिळू शकते. हळद स्वच्छ करणे, उकळणे, वाळविणे, दळणे, प्रतवारी करणे, पॅकिंग तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विविध उत्पादने तयार करण्यास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ कच्च्या शेतमालाच्या विक्रीवर अवलंबून न राहता प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण करता येण्यासाठी केंद्र सज्ज आहे अशी माहिती केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सांगितले.

    मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून हळद उत्पादक शेतकऱ्यांना संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. हळद प्रक्रिया उद्योगांशी संबंधित लघुउद्योग, उद्योजकता आणि पूरक व्यवसायांना प्रोत्साहन मिळाल्यास स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. कृषी उत्पादनाला प्रक्रिया उद्योगाची जोड मिळाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल. शेतकरी, कृषी तज्ज्ञ, संशोधक आणि उद्योजक यांच्यात समन्वय साधून हिंगोली जिल्ह्यातील हळद उत्पादनाला व्यापक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरेल, असेही  नमूद केले.

    यावेळी केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील यांनी केंद्राच्या कार्याची सविस्तर माहिती दिली, तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

    0000

    - Advertisement -