
मुंबई, दि. ६ : दिवाळी सणाच्या अनुषंगाने मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना सोमवार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
२०२६ मध्ये मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी यापूर्वी गोपाळकाला (दहीहंडी) आणि अनंत चतुर्दशी या सणांच्या निमित्ताने स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, ५ सप्टेंबर २०२६ रोजीची गोपाळकाला (दहीहंडी) सुट्टी शनिवार या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी आल्याने, शासनाच्या १० ऑगस्ट २०२६ रोजीच्या शुद्धिपत्रकानुसार त्याऐवजी शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ रोजी रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
त्यानुसार, २०२६ मधील तिसरी स्थानिक सुट्टी दिवाळीनिमित्त सोमवार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी देण्यात आली आहे. हे आदेश मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना लागू राहतील.
०००

WhatsApp