मातोश्री शेत पाणंद रस्त्यांसाठी ११६ कोटी रुपयांचे पूरक कुशल अनुदान वितरित – रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. ६ : मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत झालेल्या कामांसाठी राज्य रोहयोचे पूरक कुशल अनुदान म्हणून ११६ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या निर्देशानुसार ही कार्यवाही करण्यात आली असून, दुष्काळी परिस्थिती आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

    शेतकऱ्यांच्या शेतीशी संबंधित अडचणी दूर करून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी संबंधित यंत्रणेला निधी वितरणाबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री भरत गोगावले यांनी दिले होते. त्यानुसार मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत झालेल्या कामांसाठ हा निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात आला आहे.

    शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी बारमाही रस्ते उपलब्ध व्हावेत तसेच शेतीची मशागत आणि शेतमालाची वाहतूक सुलभ व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाकडून मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत आहे. वितरित करण्यात आलेल्या निधीमुळे उर्वरित कामांना गती मिळण्यास मदत होणार आहे.

    पाणंद रस्ते हे ग्रामीण शेतीव्यवस्थेतील महत्त्वाचे पायाभूत साधन आहे. शेतमाल बाजारपेठेत पोहोचविणे, शेतीची दैनंदिन कामे करणे आणि शेतापर्यंत पोहोचणे यासाठी या रस्त्यांचा उपयोग होतो. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहताना ग्रामीण भागातील विकासकामेही थांबू नयेत, या भूमिकेतून निधी वितरणाची कार्यवाही करण्यात आली आहे. यापुढेही निधी उपलब्ध होईल तसा तातडीने वितरीत करण्यात येईल, असे सांगून रोहयो मंत्री गोगावले यांनी यानिमित्ताने शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास देऊन दिवाळीनिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

    00000

    बी.सी.झंवर/विसंअ

    - Advertisement -