दुष्काळानिमित्त मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना दिलासा – महासंवाद

    - Advertisement -

    राजापूरच्या श्रीधर हातणकर यांनी मानले शासनाचे आभार

    रत्नागिरी, दि. ०७ (जिमाका): पावसाच्या लहरीपणामुळे भात पिकाचे मोठे नुकसान होऊनही शासनाने वेळीच पंचनामे करून थेट खात्यात दिवाळीसाठी ५ हजार अग्रिम मदत जमा केल्याने राजापूर तालुक्यातील शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला आहे. गोठणे दोनिवडे येथील शेतकरी श्रीधर हातणकर यांनी शासनाकडून मिळालेल्या अग्रिम मदतीबद्दल कृषी विभाग व महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.

    राजापूर तालुक्यातील गोठणे दोनिवडे येथील शेतकरी श्रीधर हातणकर यांनी चालू हंगामात सुमारे ३० गुंठे भातशेती केली होती. मात्र, पावसाअभावी पिक कोमेजून गेल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.

    नुकसानीची दखल घेत कृषी विभाग, महसूल विभाग आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त पथकाने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे पूर्ण केले. शेतकऱ्यांनीही या पंचनाम्यादरम्यान प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले. या जलद प्रक्रियेनंतर शासनाकडून श्रीधर हातणकर यांच्या बँक खात्यावर दिवाळी भेट म्हणून ५ हजार रुपयांची अग्रिम मदत थेट जमा करण्यात आली.

    ऐन अडचणीच्या वेळी मिळालेल्या या मदतीबद्दल समाधान व्यक्त करताना श्रीधर हातणकर म्हणाले, “पावसाअभावी भातशेतीचे मोठे नुकसान झाले होते. परंतु, शासनाच्या महसूल, कृषी व ग्रामपंचायत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बांधावर येऊन तत्परतेने पंचनामा केला. शासनाकडून ५ हजार रुपयांची अग्रिम रक्कम थेट खात्यात जमा झाली असून, संकटकाळात आधार दिल्याबद्दल मी महाराष्ट्र शासन व कृषी विभागाचा मनापासून आभारी आहे.

    ०००

    आंबडवे येथील शेतकरी दीपक जाकण यांनी मानले शासनाचे आभार

    रत्नागिरी, दि. ०७ (जिमाका): जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे शेतीचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर शासनाकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अग्रिम (आगाऊ) ५ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करून वितरित करण्यात येत आहे.

    आंबडवे (ता. मंडणगड) येथील शेतकरी दीपक जाकण यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “या वर्षी समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे पिकांचे अमाप नुकसान झाले आहे. अशा संकट काळात शासनाने तातडीने ५ हजार रुपयांची अग्रिम मदत उपलब्ध करून दिली आहे. या आर्थिक मदतीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार मिळाला असून मी शासनाचा मनापासून आभारी आहे.”

    कमी पावसामुळे कोकणातील शेतकरी चिंतेत असताना शासनाकडून मिळालेल्या या मदतीमुळे स्थानिक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

    ०००

    - Advertisement -