
नागपूर दि. ७ : शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध व नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी यंत्रणेने अधिक
सतर्क राहून कामे पूर्ण करावीत,असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. संभाव्य दुष्काळी परिस्थिती व
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज वाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेला भेट देऊन
संपूर्ण व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली.
या पाहणीदरम्यान वाडीचे नगराध्यक्ष नरेश चरडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) श्री.
बहादूरे, कार्यकारी अभियंता विद्या कानडे, उपविभागीय अभियंता श्री.नघाटे, उपविभागीय अभियंता (यांत्रिकी) श्री.बत्तूलवार
तसेच वाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव आणि संबंधित योजनेचे अभियंता उपस्थित होते.
वेणा धरण व जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करत जिल्हाधिकाऱ्यांनी इतर माहिती घेतली. या धरणातून महाराष्ट्र
जीवन प्राधिकरणामार्फत वाडी, देवलामेटी व आयुध निर्माणी अंबाझरीला पाणीपुरवठा केला जातो. येथील लोकसंख्या १
लाखापेक्षा अधिक असून दरदिवशी २३.६८ दशलक्ष लिटर पाण्याची मागणी आहे. सद्यस्थितीत वेणा प्रकल्पात ५६.४२ टक्के
पाणीसाठा उपलब्ध असून नोव्हेंबर २०२५ मध्ये हाच पाणीसाठा ९९.८८ टक्के होता, जो गतवर्षीच्या तुलनेत यंदा लक्षणीयरीत्या
कमी आहे. यावर उपाय योजना करण्याबाबत श्री आशीर्वाद यांनी संबंधितांशी सविस्तर चर्चा केली.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार, वेणा धरणाच्या पाण्यात लोह, अमोनिया आणि सेंद्रिय पदार्थ
म्हणजेच बीओडी यांचे प्रमाण प्राधान्याने नियंत्रित करणे आवश्यक असल्याचे मजीप्राच्या अभियंत्यांनी सांगितले. धरणाची
पाणीपातळी खालावल्यास या घटकांचे प्रमाण वाढून पारंपारिक पद्धतीने पाणी शुद्ध करणे कठीण होऊ शकते. यामुळे पाण्याच्या
उपलब्धतेसोबतच गुणवत्तेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे असून याबाबत शक्य त्या सर्व
पर्यायांचा अवलंब करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी श्री आशीर्वाद यांनी येथील पाणी शुद्ध करणाऱ्या प्रक्रियेची माहिती घेत वितरण व्यवस्थेनुसार पाण्याची
नियमित तपासणी करण्याचे निर्देश दिले.पाण्याच्या साठ्यात घट झाल्यास जलाशयातील दूषित पाण्यावर ओझोन, नॅनोबबल
तंत्रज्ञान व फोम फॅक्शनेटर (ओझोक्रॅक्शनेशन) यांच्या संयुक्त वापराने करावयाच्या प्रात्यक्षिक चाचण्यांची उपविभागीय
अभियंत्यांनी माहिती दिली. तांत्रिकदृष्ट्या येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी प्रभावीपणे शुद्ध करणे शक्य होत असून ही
सकारात्मक बाब असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
पाणी शुद्धीकरण करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश
यावर्षी वेणा धरणातील पाणीपातळी कमी झाल्यास अंबाझरीचे पाणी घेणे अनिवार्य ठरणार असून, याच पद्धतीने
अंबाझरीच्या दूषित पाण्यावरही प्रक्रिया करता येईल. ही यंत्रणा वेणा व अंबाझरी या दोन्ही स्रोतांच्या पाण्यासाठी
कायमस्वरूपी उपाय ठरणार असून नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होईल. त्यानुसार ओझोन, नॅनोबबल तंत्रज्ञान व
फोम फॅक्शनेटर या आधुनिक पद्धतीने पाणी शुद्धीकरण करण्याचा प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे
निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.
जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी व पाण्याच्या गुणवत्तेबाबत विशेष सूचना
जिल्हाधिकारी यांनी वाडी जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली असता येथील कार्यपद्धती, केंद्राची क्षमता, पाण्याची
गुणवत्ता, देखभाल व दुरुस्ती तसेच शुद्ध पाण्याच्या वितरण व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला. नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व
गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध होणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे सांगत त्यांनी जलशुद्धीकरण केंद्राची
नियमित स्वच्छता, आवश्यक देखभाल-दुरुस्ती, पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी आणि शुद्धीकरण प्रक्रियेवर प्रभावी
नियंत्रण ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. पाण्याचे उपलब्ध स्रोत, साठवण क्षमता, पाणी उपसा, जलशुद्धीकरण प्रक्रिया, वितरण
व्यवस्था, पाण्याची गळती तसेच पर्यायी जलस्रोतांच्या सद्यस्थितीचा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी आढावा घेतला. पाण्याची
गळती रोखणे, जुन्या जलस्रोतांचे पुनरुज्जीवन व पाणीसंवर्धनासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले.
पाणीपुरवठ्याच्या मूळ स्रोतापासून जलशुद्धीकरण, वितरण व्यवस्था आणि पर्यायी जलस्रोतांपर्यंत सर्व बाबींचा प्रत्यक्ष
आढावा घेऊन प्रशासनाकडून पाणी टंचाईच्या संभाव्य संकटाला सामोरे जाण्यासाठी करण्यात येणाऱ्या पूर्वतयारीवर त्यांनी भर
दिला.
******

WhatsApp