
अहिल्यानगर, दि. ७ (जिमाका) : दुष्काळाच्या संकटात शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनी स्वतःला एकटे समजू नये. राज्य शासन प्रत्येक संकटात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, दुष्काळ निवारणासाठी विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. शेतकरी, पशुधन आणि ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. प्रशासनाने शासनाच्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करून दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी समन्वयाने काम करावे, असा विश्वास पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
पाथर्डी तालुक्यातील कळसपिंपरी येथे पालकमंत्री डॉ. विखे पाटील आणि आमदार मोनिका राजळे यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या अडचणी, समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या. यावेळी दुष्काळग्रस्त शेतकरी भीमसेन शंकर भवार यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली. कुटुंबीयांना दिवाळीचा फराळ आणि कपडे देत त्यांना दिलासा दिला. विशेष म्हणजे, पालकमंत्री डॉ. विखे पाटील आणि आमदार मोनिका राजळे यांनी भवार कुटुंबीयांसोबत जेवण करून दिवाळीचा आनंद साजरा केला. गावातील इतर कुटुंबीयांनाही दिवाळीचा फराळ आणि फटाक्यांचे वाटप करण्यात आले. शासन आपल्या सुख-दुःखात सहभागी असल्याचा विश्वास या भेटीतून ग्रामस्थांना देण्यात आला.

यावेळी पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. शेतकरी, पशुधन आणि सर्वसामान्य नागरिकांना या संकटातून दिलासा मिळावा, यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. दुष्काळाचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित राहत नाही, तर त्याचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्था आणि पशुधनावरही होतो. त्यामुळे या सर्व घटकांचा विचार करून उपाययोजना आखण्यात येत आहेत.
पशुधन जगविण्यासाठी चारा उत्पादनाला प्रोत्साहन
दुष्काळाच्या काळात जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यावर मात करण्यासाठी चारा उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने चारा उत्पादनाचे नियोजन केले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे, त्यांना चारा उत्पादनासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. पशुसंवर्धन आणि कृषी विभागाच्या संयुक्त पाहणीतून पशुधनाची संख्या तसेच उपलब्ध चाऱ्याचा आढावा घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे पशुधन सुरक्षित राहावे आणि चारा टंचाईचा प्रश्न निर्माण होऊ नये, या दृष्टीने प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढील आठ ते नऊ महिन्यांच्या पाणीटंचाईसाठी आतापासूनच नियोजन
पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर बोलताना पालकमंत्री म्हणाले की, सध्या आवश्यक त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. नागरिकांना पुरविण्यात येणारे टँकरचे पाणी शुद्ध आणि सुरक्षित असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. आगामी आठ ते नऊ महिन्यांतील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

ग्रामस्थांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना
यावेळी ग्रामस्थांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, रेशनवरील धान्यपुरवठा, संजय गांधी निराधार योजना, बंधाऱ्यांचे खोलीकरण आणि जनावरांसाठी पाण्याची उपलब्धता यासह विविध प्रश्न पालकमंत्र्यांसमोर मांडले. काही लाभार्थ्यांकडे रेशनकार्ड असूनही धान्य मिळत नसल्याच्या तक्रारीही ग्रामस्थांनी केल्या. पालकमंत्र्यांनी ग्रामस्थांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत शासन केवळ मदतीच्या घोषणा न करता प्रत्यक्ष गावागावांत पोहोचून नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणे, पशुधनासाठी चारा-पाण्याचे नियोजन करणे आणि प्रत्येक गरजू कुटुंबाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, याला शासनाचे प्राधान्य आहे. कळसपिंपरी येथील या भेटीतून शासनाची शेतकरी आणि ग्रामीण जनतेप्रती असलेली संवेदनशीलता अधोरेखित झाली. यावेळी प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, गटविकास अधिकारी राजेंद्र धस यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
०००००

WhatsApp