
नागपूर, दि. ०७ : राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना धीर देण्यासोबतच त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी शेतकऱ्यांसोबत दिवाळी सण साजरा करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी आज नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा (ता.नरखेड) येथे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. शेतकऱ्यांनी संवाद साधतांना दुष्काळाच्या संकटातून बाहेर पडू, असा विश्वास व्यक्त केला. गावातच रामभाऊ बालपांडे या शेतकऱ्यांच्या घरी भरीत भाकरीचे जेवण करुन मुक्काम केला.

यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार राजू पोतदार, आमदार चरणसिंह ठाकूर, आमदार आशिष देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, माजी आमदार सुधाकर कोहळे, सरपंच विपीन चाफले आदी उपस्थित आहेत.
लोहारी सावंगा येथे आगमन झाल्यानंतर महिलांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. त्यानंतर सामुदायिक प्रार्थनेत त्यांनी सहभाग घेतला. रामभाऊ बालपांडे या शेतकऱ्याच्या घरी जेवण करुन दिवाळी सणानिमित्त गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी, समस्या, दुःख जाणून घेतले.

कमी पर्जन्यमानामुळे यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करत आहे. नागरिकांना पिण्यासाठी पाणी, जनावरांना चारा आणि उपलब्धतेनुसार सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी संवाद साधतांना सांगितले.

यावेळी शेतकऱ्यांनी मोकळेपणाने मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला, आपल्या समस्या मांडल्या. शेतकरी पुरुषोत्तम वघाळे यांनी खोरी प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर यासाठी मान्यता देण्यात आली असून लवकरच काम सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जगदीश देशमुख या शेतकऱ्याने ४३ वर्षांपूर्वी पायाभरणी झालेल्या पाझर तलावाची अडचण सोडवून तलाव पूर्ण करण्याची मागणी केल्यानंतर याबाबत आवश्यक कारवाई लवकरच करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पाणी फाऊंडेशनचा युवा कार्यकर्ता जयंत चाफले यांनी जुन्या खोरी तलावाचे काम मार्गी लावल्याबद्दल आभार व्यक्त केले. राजेंद्र चाफले व तेजपाल चौधरी यांनी रोही, वाघ, रानडुकरांचा शेती पिकांना मोठा फटका बसत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. सौर कुंपण आपण देतो आहे, परंतु शेतकऱ्यांचा फारसा प्रतिसाद याला मिळत नाही, त्यामुळे शेतीलगतच्या जंगलांनाच शक्य तेथे आपण कुंपण करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. लोहारी सावंगी येथे पशुवैद्यकीय दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरिकांना रेशन धान्य वाटपाचा विषय गावकरी यांनी मांडला. दुष्काळी परिस्थितीमुळे सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांवर धान्य वितरित केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

१८ लाख शेतकऱ्यांना ५० हजार सानुग्रह अनुदान
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, अशी विनंती एका शेतकऱ्याने केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देखील ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान आपण देतो आहे. कर्जमाफीची रक्कम जमा झाल्यानंतर नियमित परतफेडीच्या १८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५० हजार जमा केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तालुकास्तरावर मुख्यमंत्री सहायता कक्ष
अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका युवकाचा अपघातात पाय निकामी झाला. त्याला तातडीने वैद्यकीय मदत मिळणे आवश्यक असल्याची बाब लक्षात आणून दिल्यानंतर त्या युवकाचा संपूर्ण उपचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. जिल्हास्तरावर यापूर्वी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष सुरू करण्यात आले आहे, दुष्काळी परिस्थितीमुळे तालुका स्तरावर देखील कक्ष सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले. प्रत्येकाचे म्हणणे मुख्यमंत्र्यांनी आत्मियतेने ऐकून घेतले व त्यावर योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
गावकऱ्यांनी व्यक्त केली कृतज्ञता
लोहारी सावंगा नागपूर जिल्ह्याच्या एका टोकावरील गाव आहे. त्यामुळे हे गाव तसे दुर्लक्षितच आहे. परंतू आपण आमच्या गावाला भेट दिली. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याचे बळ आणि आत्मविश्वास दिला, अशी भावना व्यक्त करत गावकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
०००

WhatsApp