दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी; टँकर, चारा व पाणीपुरवठ्याचे शासनाने तातडीने नियोजन करावे -पालकमंत्री जयकुमार गोरे – महासंवाद

    - Advertisement -

    सोलापूर, दिनांक 9 : दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीचे शासनाने सरसकट पंचनामे केले असून, शेतकऱ्यांना दिवाळी सण साजरा करता यावा, यासाठी दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रीम आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तांत्रिक अडचणींमुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत, त्यांनाही लवकरच मदत मिळेल. दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

     

    रेडे्डे तालुका मंगळवेढा येथील नागरिकांशी संवाद साधताना पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते.यावेळी आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन, उपविभागीय अधिकारी अमित माळी, तहसीलदार मदन जाधव यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

     

    पालकमंत्री श्री. गोरे पुढे म्हणाले की, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी तांत्रिक बाबींचा आधार घेऊन दुष्काळी उपाययोजनांच्या अंमलबजावणीत अडथळे निर्माण करू नयेत. शेतकरी आणि नागरिकांच्या वेदना समजून घेऊन अधिक संवेदनशीलतेने काम करावे. पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये किमान 24 ते 48 तासांच्या आत टँकर सुरू करावेत. गावातील प्रत्येक वाडी-वस्ती आणि गल्लीपर्यंत टँकर पोहोचेल, याची दक्षता घ्यावी. गावातील रस्ते ची परिस्थिती लक्षात घेऊन मोठा किंवा लहान टँकर उपलब्ध करून द्यावा. दुष्काळी परिस्थितीत एकही तलाठी अथवा ग्रामसेवक मुख्यालय सोडून जाणार नाही, याची जिल्हा प्रशासनाने काळजी घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

     

    नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच गावातील पशुधनाची संख्या लक्षात घेऊन जनावरांसाठीही पुरेसा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे. चारा उपलब्धतेबाबत प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात. राज्यातील चारा डेपो, चारा छावण्या सुरू करणे किंवा शेतकरी व पशुपालकांना चारा खरेदीसाठी अनुदान देणे याबाबतचा प्रश्न आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मांडून तो मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाहीही पालकमंत्री गोरे यांनी दिली.

     

    जिल्ह्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने सोडवण्यासाठी सोलापूर शहरातील नियोजन भवन येथील पालकमंत्री कार्यालयामार्फत 24 तास सुरू राहणारी हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे. या हेल्पलाइनवर नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्यानंतर संबंधित प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

     

     

     

    जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाने कोणत्या गावांमध्ये चारा उपलब्ध आहे, तसेच कोणत्या गावांना तातडीने चाऱ्याची गरज आहे, याची माहिती त्वरित सादर करावी. शासनाने सरसकट पंचनामे केले असून, दिवाळीपूर्वी अग्रीम मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित मदतही लवकरच देण्यात येईल. तसेच अन्नधान्याची कमतरता निर्माण झाल्यास शासनाकडून त्याचाही पुरवठा केला जाईल, असे पालकमंत्री गोरे यांनी स्पष्ट केले.

     

    मंगळवेढा तालुक्यातील एकूण गावांपैकी निम्म्यापेक्षा अधिक गावे दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहेत. या गावांमध्ये चाऱ्याची उपलब्धता कमी असून, नदीकाठच्या गावांमध्ये तुलनेने चारा उपलब्ध आहे. त्यामुळे गाव हा घटक मानून चारा आणि पाण्याचे नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले. म्हैसाळ सिंचन योजना आणि 24 गाव पाणीपुरवठा योजनेची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. या योजनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

     

    यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती दिली. तालुक्यातील जवळपास 47 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, नदीकाठची गावे वगळता अन्य गावांमध्ये चाऱ्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. पशुपालकांना इतर ठिकाणांहून चारा विकत आणावा लागत आहे. म्हैसाळ पाणीपुरवठा योजना तसेच 24 गाव पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण झाल्यास तालुक्यातील सर्व गावांना किमान पिण्याचे पाणी शंभर टक्के उपलब्ध होऊ शकेल. यासाठी आवश्यक निधी शासनस्तरावरून उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

     

    यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी जनावरांसाठी पिण्याचे पाणी व चारा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच लहान गावांमध्ये मोठे टँकर जाणे शक्य नसल्याने अशा गावांसाठी लहान टँकरची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली.

     

    यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सर्व ग्रामस्थांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या समवेत दिवाळीच्या फराळ ही घेतला.

     

    00000

    - Advertisement -