जिल्ह्यातील गावागावांत वनराई बंधारे बांधून जलसाठ्याचे संवर्धन करा; दुष्काळ निवारणासाठी वर्षभर नियोजन करा – मंत्री आदिती तटकरे – महासंवाद

    - Advertisement -

    नंदुरबार, दि. १३ : हवामान बदलामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढून उपलब्ध जलसाठा लवकर कमी होत आहे. संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृषी व वन विभागाच्या समन्वयातून गावागावांत वनराई बंधारे बांधावेत. रोजगार हमी योजना, ग्रामस्थांच्या सहभागातून जलसंधारणाची कामे वर्षभर राबवावीत. तसेच पाणीसाठा वाढविण्यासाठी बंधाऱ्यांमधील गाळ काढण्याची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

    जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी आयोजित दुष्काळ निवारण आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी खासदार ॲड.गोवाल पाडवी, आमदार आमश्या पाडवी, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, माजी खासदार डॉ. हिना गावित, एक दिवसाच्या जिल्हाधिकारी आचल वसावे आदी उपस्थित होते.

    मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, जलजीवन मिशनअंतर्गत ७० टक्के काम पूर्ण झालेल्या आणि उर्वरित कामांसाठी निधी आवश्यक असलेल्या योजनांना प्राधान्याने निधी मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वय साधावा. आगामी दोन वर्षे हवामानाच्या दृष्टीने आव्हानात्मक असण्याची शक्यता असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर आणि लोकसहभागातून जलव्यवस्थापनावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

    वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर बालके, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शाळा व अंगणवाड्यांच्या वेळांमध्ये स्थानिक परिस्थितीनुसार बदल करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. स्थलांतरित मजुरांच्या कुटुंबांना अन्य जिल्ह्यांतही अंगणवाडीचा पोषण आहार मिळावा, यासाठी संबंधित जिल्ह्यांशी समन्वय साधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    यंदा हवामानातील बदल लक्षात घेता पाणी अडविणे, जिरविणे आणि उपलब्ध पाणीसाठा टिकविणे आवश्यक आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रस्तावित कामांना तातडीने मंजुरी द्यावी. बंधारे आणि जलसाठ्यांमधील गाळ शेतकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध करून द्यावा. यामुळे शेतजमिनीची सुपीकता आणि जलसाठ्यांची क्षमता वाढण्यास मदत होईल.

    दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुढील सात ते आठ महिने सर्व संबंधित विभागांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन दरमहा आढावा बैठक घ्यावी. पाणीटंचाई आराखड्यात दर तीन महिन्यांनी आवश्यक सुधारणा कराव्यात, असेही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

    खासदार ॲड. गोवाल पाडवी, आमदार आमश्या पाडवी, माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी विविध सूचना केल्या. या सूचनांची दखल घेण्यात यावी, असेही निर्देश मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाई, रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेली कामे, धान्यसाठा, जनावरांसाठी चारा उपलब्धता आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदान वितरणाबाबत माहिती दिली. या बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

     000000

    - Advertisement -