
(अन्न, नागरी पुरवठा विभाग)
राज्यातील ३३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोफत धान्य मिळणार
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुढील तीन महिन्यांसाठी माणशी पाच किलो धान्य
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्हा वगळता उर्वरित ३३ जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या शेतकऱ्यांना मोफत धान्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. याचा फायदा राज्यातील ४२ लाख ३० हजार ७८३ शेतकऱ्यांना मिळणार आहे.
राज्यात अभूतपूर्व अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत ५ कोटी ७९ लाख ३४ हजार ७०२ लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य तर १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील २१ लाख ६० हजार ६८२ शेतकऱ्यांना दरमहा १७० रूपये दिले जातात. दोन्ही योजनांचा लाभ न मिळणाऱ्या शेतकरी कुटुंबांचा विचार करून त्यांनाही दर महिन्याला माणशी पाच किलो अन्नधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे धान्य पुढील तीन महिन्यांसाठी वितरित करण्यात येईल. तसेच त्यापुढील काळासाठी आढावा घेऊन योजना सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत अन्नधान्याचा लाभ तसेच एपीएल-डिबीटी योजनेचा रोख लाभ मिळत नसलेल्या एकूण ३३ जिल्ह्यांतील ४२,३०,७८३ शेतकऱ्यांना दरमहिन्याला माणशी ५ किलो (३किलो तांदूळ + २ किलो गहू) या प्रमाणात ३ महिन्यांकरिता मोफत धान्य देण्यात येणार आहे.
आधार सीडिंग पूर्ण झालेल्या शिधापत्रिकाधारकांना ई-पॉस मशीनद्वारे बायोमेट्रिक पडताळणी करून धान्य वाटप करण्यात येणार आहे. उर्वरित लाभार्थ्यांचे आधार सीडिंग पूर्ण करून घेतल्यानंतरच त्यांना बायोमेट्रिक पडताळणीद्वारे हे धान्य देण्यात येईल. या मोफत धान्य वितरणाकरिता आवश्यक असणारे अतिरिक्त नियतन केंद्र शासनाच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडून मागणी करण्यास मान्यता देण्यात आली.
-०००-
(जलसंपदा विभाग)
नंदुरबारमधील २६ हजार ५२६ हेक्टर क्षेत्राला सिंचन
नर्मदा तापी वळण योजनेसाठी ५ हजार ५४८ कोटी रुपयांची मान्यता
नर्मदा खोऱ्यातील २६ हजार ५२६ हेक्टर क्षेत्राला सिंचन करणाऱ्या नर्मदा तापी वळण योजनेच्या कामांसाठी पाच हजार ५४८ कोटी रुपयांच्या तरतुदीस आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात मान्यता आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील नर्मदा-तापी वळण योजनेस जलसंपदा विभागाची २०२३-२४, सार्वजनिक बांधकाम विभागाची २०२२-२३ व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या २०२३-२४ दरसूचीवर आधारित एकूण पाच हजार पाचशे अट्ठेचाळीस कोटी चार हजार रुपये किमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. प्रकल्पाचा “१० daily basis” समरूपता अभ्यास हा सक्षमस्तरावरून मंजूर करण्यात यावा यांसह विविध अटी व शर्तीही ठेवण्यात आल्या आहेत. केंद्रीय जल आयोगाची मान्यता प्राप्त करून घेण्याची कार्यवाही समांतरपणे केली जाणार आहे. तसेच ११.५ मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प Built-Operate-Transfer (BOT) तत्त्वावर उभारण्यात येणार आहे. यात वीज निर्मितीसाठी पाणी सोडण्याचे वेळापत्रक हे सिंचनासाठीच्या पाण्याच्या वापराशी विसंगत ठरणार नाही, याची दक्षता घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
हा प्रकल्प तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव अंतर्गत नर्मदा तापी वळण योजना (ता. धडगाव जि. नंदुरबार) म्हणून प्रस्तावित आहे. हा प्रकल्प तापी नदी व नर्मदा नदी या दोन खोऱ्यातील आहे. नर्मदा जल तंटा लवादाच्या अंतिम निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्यास येणारे नर्मदा खो-यातील उपलब्ध होणारे पाणी खडकी वळण बंधारा, लेकडा वळण बंधारा, वेलखेडी वळण बंधारा, मोंजरा वळण बंधारा, राजबर्डी वळण बंधारा, शेलकुई वळण बंधारा असे एकूण ६ वळण बंधारे व जलोला मुख्य धरणाचे बांधकाम करुन कालवा व बोगदाद्वारे सदर पाणी तापी खो-यात वळवुन बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे तळोदा व शहादा तालुक्यातील अनुक्रमे ९४१० हे. व १४११६ हे (एकूण २३५२६ हे.) क्षेत्रास व धडगाव तालुक्यात शेलकुई व राजबर्डी वळण बंधारा येथुन अनुक्रमे ५०३ हे. व ३३६ हे. व जलोला मुख्य धरणातुन २१६१ हे. (एकूण ३००० हे. वैयक्तिक उपसा द्वारे) असे एकूण २६ हजार ५२६ हे. क्षेत्रास सिंचनाचा लाभ व ११.५० मेगावॅट वीज निर्मितीसाठी वापरले जाणार आहे. या प्रकल्पाचे लाभक्षेत्र आदिवासी उपयोजना क्षेत्रात आहे.
-०००-
(गृह विभाग)
आर्थिक फसवणुकीतील संस्थांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया जलद होणार
विभागीय स्तरावर एमपीआयडी न्यायाधिकरण, ९० दिवसांत प्रकरण निकाली निघणार
आर्थिक फसवणूक करणाऱ्या संस्थांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया जलद राबविता येईल, तसेच त्यासाठी विभागीय स्तरावर स्वतंत्र एमपीआयडी न्यायाधिकरण स्थापन करण्यास व या प्रकरणात नव्वद दिवसांच्या आत प्रकरण निकाली काढण्याची कालमर्यादा निश्चित करण्यास आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमामध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
वित्तीय संस्थांमधील ठेवींवर अवास्तव परताव्याचे आमिष दाखवून, गुंतवणूकदारांना फसवणाऱ्या संस्था व व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम, १९९९ हा कायदा करण्यात आला आहे. यात फसवणुकीस आळा घालण्यासाठी संबंधित वित्तीय संस्था व व्यक्ती यांच्या मालमत्ता जप्त करून, ही जप्ती विशेष न्यायालयाकडून अंतिम केली जाते. त्यानंतर यातील मालमत्तांच्या विक्रीतून येणाऱ्या रकमेतून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना रक्कम परत केली जाते. यातील जप्तीची प्रक्रिया जलद व्हावी याकरिता विशेष न्यायालयाऐवजी विभागीय स्तरावर स्वतंत्र एमपीआयडी न्यायाधिकरण स्थापन करण्याची तरतूद करण्यात येणार आहे. तसेच असे प्रकरण दाखल झाल्यापासून नव्वद दिवसांच्या आत ते निकाली काढण्याची कालमर्यादा घालण्यात येणार आहे. यासंबंधीच्या तरतुदींचे सुधारणा विधेयक विधिमंडळात सादर करण्यास मंजुरी देण्यात आली.
-०००-
(महसूल विभाग)
महसूल दावा व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित होणार
एक जिल्हा – एक अपीलची तरतूद, अर्धन्यायिक प्रकरणांसाठी गतिमान प्रणाली
महसूल विभागातील अर्धन्यायिक कामकाजाकरिता महसूल न्यायालय दावा व्यवस्थापन प्रणाली (रेव्हेन्यू कोर्ट केस मॅनेजमेंट सिस्टम) लागू करण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ‘एक जिल्हा, एक अपील’ ही तरतूद लागू केली जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
राज्यात महसूल विभागांतर्गत विविध स्तरांवर अर्धन्यायिक महसुली प्रकरणे प्रलंबित राहतात. अशी प्रकरणे प्रलंबित राहिल्यास संबंधित जमिनीचा विकास करणे, हस्तांतरण करणे अशा बाबींवर परिणाम होतो. पर्यायाने नागरिकांसाठीही अडचणी निर्माण होतात आणि शासनाच्या महसुलाची हानी होते, असे आढळून आले आहे. त्यामुळे अशा अर्धन्यायिक कामकाजामध्ये प्रक्रियात्मक सुधारणा करण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्धन्यायिक प्रकरणांची सुनावणी ऑनलाइन पद्धतीने करता यावी, याकरिता महसूल न्यायालयीन दावा व्यवस्थापन प्रणाली (Revenue Court Case Management System) राबविण्यात येणार आहे. तसेच अशा प्रकरणांमधील अनावश्यक अपीलांचे टप्पे कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. अशी अर्धन्यायिक प्रकरणे विहित वेळेत निकालात काढण्याकरिता “एक जिल्हा, एक अपील” अशी पद्धत अवलंबिली जाणार आहे. या दोन्ही बाबींसाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मध्ये तरतूद करावी लागणार आहे. यासाठी यासंबंधित विधेयकामध्ये सुधारणा करण्यास आज बैठकीत मान्यता देण्यात आली.
-०००-
(वैद्यकीय शिक्षण विभाग)
आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्त्यात वाढ
राज्यातील आरोग्य विज्ञानाच्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता लागू आहे. त्यांच्या या भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत शासकीय, शासन अनुदानित व खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांतील (अभिमत विद्यापीठे/स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून) आरोग्य विज्ञान व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांना शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (Centralized Admission Process-CAP) प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी EBC, SEBC, EWS या प्रवर्गांतील ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पात्र विद्यार्थ्यांना भोजन, निवास व निर्वाहाचा खर्च भागविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता देण्यात येतो. या भत्त्यात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून वाढ करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या शहरांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता ३२,०००, निवास भत्ता २०,०००, निर्वाह भत्ता ८,००० असा एकूण ६०,००० रुपये, तर इतर महसुली विभागीय शहरांतील व उर्वरित ‘क’ वर्गातील महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता २८,०००, निवास भत्ता १५,०००, निर्वाह भत्ता ८,००० असा एकूण ५१,००० रुपये, इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता २५,०००, निवास भत्ता १२,०००, निर्वाह भत्ता ६,००० असा एकूण ४३,००० रुपये, तर तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता २३,०००, निवास भत्ता १०,०००, निर्वाह भत्ता ५,००० असा एकूण ३८,००० रुपये असा करण्यात आला आहे.
-०००-
(शालेय शिक्षण विभाग)
शालार्थ प्रणालीतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी
बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण सुविधा
राज्यातील शालार्थ प्रणालीत समाविष्ट असणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. ही सुविधा आरबीआयकडे नोंदणीकृत संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच मान्यताप्राप्त खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचार, पाल्यांचे शिक्षण व अन्य कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी तातडीची आर्थिक गरज भागवता यावी, यासाठी बिगर बँकिंग वित्तीय संस्थांसोबत सामंजस्य करार केले जाणार आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना सुलभपणे वित्तीय सुविधा उपलब्ध होणार आहेत. कर्मचाऱ्यांना वेतनाशी संलग्न अग्रिम, कर्जसुविधा व इतर वित्तीय साहाय्य त्वरित व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होणार असल्याने हे त्यांच्यासाठी आर्थिक सक्षमीकरणाचे व्यासपीठ ठरेल.
शालेय शिक्षण विभागामार्फत खुल्या, पारदर्शक व स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेद्वारे आरबीआयकडे नोंदणीकृत पात्र बिगर बँकिंग वित्तीय संस्थांची निवड करण्यात येईल. या व्यासपीठांतर्गत आर्थिक साक्षरता, वित्तीय नियोजन आणि विमा यांसारख्या पूरक सेवांचा लाभ उपलब्ध होणार आहे.
-०००-
(महसूल विभाग)
दानपत्रासाठी आता पाचशे रुपये मुद्रांक शुल्क, अपील शुल्क हजार रुपये
मुद्रांक शुल्क परताव्यासाठी अर्ज करण्यासाठी एक वर्षाची मुदत
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील विविध प्रकारच्या नोंदणीसाठी आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कात एकरूपता व सुसंगती आणण्याकरिता महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम ३२ (ब) आणि ५३ (१अ) आणि कलम ५२ मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील अनुच्छेद ३४ नुसार निवासी किंवा कृषी मालमत्ता पती, पत्नी, मुलगा, मुलगी, नातू, नात किंवा मयत मुलाची पत्नी यांना दान केल्यास दानपत्रासाठी आता २०० रुपयांऐवजी पाचशे रुपये मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच कलम ३२ (ब) आणि कलम ५३ (१अ) अंतर्गत अपीलासाठी यापूर्वी तीनशे रुपये शुल्क आकारण्यात येत होते. आता या दोन्ही प्रकारांसाठी एक हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. याशिवाय कलम ५२ अंतर्गत मुद्रांक शुल्क परताव्यासाठी मुद्रांक खरेदी केल्यापासून सहा महिन्यांच्या आत अर्ज करावा लागत असे. आता ही मुदत मुद्रांकधारकांना पुरेसा कालावधी उपलब्ध व्हावा, यासाठी सहा महिन्यांवरून एक वर्ष करण्यात येणार आहे. याबाबतचे विधेयक विधिमंडळात सादर करण्यास मंजुरी देण्यात आली.
-०००-
(उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांच्या अधिनियमांमध्ये सुधारणा करण्यास मंजुरी
नवीन शैक्षणिक धोरणानुसार आवश्यक ते बदल करण्यासाठी अनिल राव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारशींनुसार रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ व नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांच्या अधिनियमांमध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ नुसार राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांची स्थापना करण्यात आली आहे. रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) अधिनियम, १९९७ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अधिनियम, १९७९ या अधिनियमांतील कलमांमध्ये कुलसचिवांची नियुक्ती, परिनियम, वित्त व लेखा समिती, इमारत बांधकाम समिती, वार्षिक अहवाल इत्यादी बाबींविषयी तरतुदी आहेत. परंतु प्रत्येक अधिनियमामध्ये त्यांची परिभाषा वेगळी असल्याने त्यात सुधारणा करणे आवश्यक होते. त्यानुसार अनिल राव समितीने केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने या दोन्ही विद्यापीठांच्या अधिनियमांमध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
-०००-
(शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग)
खासगी अनुदानित शाळांच्या विनियमनासाठी सर्वसमावेशक कायदा
राज्यातील खासगी अनुदानित शाळांच्या विनियमनासाठी महाराष्ट्र खासगी अनुदानित शाळा (विनियमन) विधेयक, २०२६ या विधेयकाच्या प्रारूपास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
खासगी अनुदानित शाळांच्या विनियमनासाठी सर्व पैलूंचा विचार करणारा सर्वसमावेशक असा कायदा आवश्यक असल्याने हे विधेयक आणण्यात येत आहे. राज्यात खासगी अनुदानित शाळांचे प्रमाण २३ टक्के आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रमाण ४७ टक्के आणि शिक्षकांचे ३७ टक्के इतके आहे. या शाळांबाबतचे विनियमन करताना महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७ व नियमावली १९८१, माध्यमिक शाळा संहिता, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ मध्ये काही उणिवा आढळल्या आहेत. त्या अनुषंगाने या खासगी अनुदानित शाळांच्या प्रभावी विनियमनासाठी हे विधेयक आणण्यात येणार आहे. या विधेयकात सुमारे वीस प्रकरणे आहेत. त्यामध्ये व्याप्ती व व्याख्या यांच्यासह खासगी अनुदानित शाळांचे प्रशासन नियंत्रित करण्याबाबतचा शासनाचा अधिकार, खासगी अनुदानित शाळेची दर्जावाढ व अतिरिक्त तुकडीला मान्यता, शाळा समिती, अल्पसंख्याक खासगी अनुदानित शाळांसाठी विशेष तरतुदी, खासगी शाळांची जबाबदारी, शाळा-तुकडी-माध्यम बंद करणे, खासगी शाळांचे परस्पर संमतीने हस्तांतरण, व्यवस्थापनातील वादामुळे प्रभावित झालेल्या शाळांमधील शिक्षकांच्या भरतीसाठी विशेष तरतुदी, शाळेच्या वेळेनंतर शाळेचे मैदान, इमारत व अन्य सुविधांचा वापर, समान स्वरूपाच्या प्रकरणांसाठी एक समान कार्यपद्धती, खासगी शाळांना अनुदान, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती व त्यांच्या सेवाशर्ती, शाळा न्यायाधिकरण, तक्रार निवारण समिती, दंड, कसूरदार व्यवस्थापनांविरुद्ध करावयाची कारवाई, लेखे व लेखापरीक्षण, अपील व पुनर्विलोकन, अन्य तरतुदी अशा प्रकरणांचा समावेश आहे.
खासगी अनुदानित शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीस चालना देणे, विद्यार्थ्यांची सुरक्षा व सुरक्षितता, अशा शाळांमध्ये सक्षम व जबाबदार प्रशासनाची निर्मिती, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तींचे विनियमन व संरक्षण, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण पदभरती व एकूणच खासगी अनुदानित शाळांच्या सर्वसमावेशक विनियमनासाठी कायदेशीर चौकट निर्माण करणारे असे हे विधेयक असेल. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० यांमध्ये गुणवत्तापूर्ण, पारदर्शक व उत्तरदायी शिक्षण पद्धतीवर भर देण्यात आला आहे.
-०००-
(कामगार विभाग)
महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार, महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक अधिनियमांमध्ये सुधारणा
राज्यामध्ये नवीन कामगार संहिता लागू करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ व महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१ या अधिनियमांमध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
नवीन कामगार संहितेमध्ये केंद्र शासनाचे विविध २९ कामगार कायदे एकत्र करून चार कामगार संहिता तयार केल्या आहेत. या संहितांमध्ये कामगारांचे हक्क सुरक्षित ठेवणे आणि उद्योगसुलभता वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. यातील वेतन संहिता, २०१९ मध्ये किमान वेतन, वेतन देण्याची पद्धत, बोनस आणि समान वेतन यांसंबंधी तरतुदी आहेत. औद्योगिक संबंध संहिता, २०२० ही कामगार संघटना, औद्योगिक वाद, सेवाअटी आणि नियोक्ता-कामगार संबंध नियंत्रित करते. सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० ही पीएफ, ईएसआय, ग्रॅच्युइटी, मातृत्व लाभ आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनांशी संबंधित आहे. तर व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामकाज परिस्थिती संहिता, २०२० ही कामाच्या ठिकाणी सुरक्षा, आरोग्य, कामाचे तास आणि कामगारांच्या कल्याणासाठी नियम निश्चित करते. या कामगार संहितांमध्ये महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ आणि महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१ या राज्य विधानमंडळाद्वारे संमत केलेल्या अधिनियमांचा समावेश केलेला नाही.
या चार कामगार संहितांमधील तरतुदी लागू केल्यानंतर केंद्रीय कायद्यांचे स्वरूप बदलले आहे. अशा बदल झालेल्या कायद्यांशी संबंधित शब्दांचा राज्याच्या अधिनियमांमध्ये जिथे आवश्यकता आहे, तिथे समावेश करावा लागणार आहे. त्यानुसार महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ व महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१ या अधिनियमांमध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली.
-०००-
(शालेय शिक्षण विभाग)
एनसीएएचपी कायद्यातून ॲक्यूपंक्चर चिकित्सा वगळण्यात येणार
ॲक्यूपंक्चर चिकित्सा पद्धतीस राष्ट्रीय सहयोगी आणि आरोग्य सेवा व्यवसाय आयोग अधिनियम, २०२१ (एनसीएएचपी कायदा) यांच्या नियामक चौकटीतून वगळण्याबाबतचे विधेयक मांडण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
केंद्र शासनातर्फे आधुनिक उपचार पद्धतीतील विविध सहयोगी व आरोग्य सेवा व्यवसाय विचारात घेऊन राष्ट्रीय सहयोगी आणि आरोग्य सेवा व्यवसाय आयोग अधिनियम लागू केला आहे. या अधिनियमाच्या नियामक यादीमध्ये ॲक्यूपंक्चर चिकित्सा पद्धतीचा समावेश करण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्र शासनाने ॲक्यूपंक्चर चिकित्सा पद्धतीचे नियमन करण्यासाठी यापूर्वीच स्वतंत्र वैधानिक परिषद, नियमावली, नोंदणी व्यवस्था आणि शैक्षणिक नियामक यंत्रणा निर्माण केलेली आहे. त्यामुळे एकाच वेळी ॲक्यूपंक्चर चिकित्सा पद्धती दोन कायद्यांनुसार नियंत्रित होत आहे. सध्या राज्याच्या ॲक्यूपंक्चर परिषदेकडे सुमारे ४ हजार ९०० ॲक्यूपंक्चर व्यावसायिकांची नोंदणी आहे. तसेच १९ संस्थांमध्ये ॲक्यूपंक्चर चिकित्सा पदविका अभ्यासक्रम सुरू असून १ हजार ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या संस्था, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून एनसीएएचपी नियामक चौकटीतून त्यांना वगळणे आवश्यक आहे. त्याबाबतचे सुधारणा विधेयक मंजूर करण्याबाबत निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
-०००-
(वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)
खासगी अनुदानित आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांतील ग्रंथपालांना सातवा वेतन आयोग
राज्यातील खासगी अनुदानित आयुर्वेद आणि युनानी महाविद्यालयांमधील शासनमान्य पदांवर कार्यरत पूर्णवेळ ग्रंथपालांना सातव्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतनश्रेण्या लागू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
हा निर्णय १ जानेवारी २०१६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार आहे. यामुळे संबंधित ग्रंथपालांना सुधारित वेतनश्रेणीचा लाभ मिळण्याबरोबरच थकीत वेतनाची रक्कमही देण्यात येणार आहे.
या निर्णयाचा लाभ राज्यातील खासगी अनुदानित आयुर्वेद आणि युनानी महाविद्यालयांमधील केवळ शासनमान्य पदांवर कार्यरत पूर्णवेळ ग्रंथपालांना मिळणार आहे. सुधारित वेतनरचना वेतनस्तर आणि सेल या संकल्पनांवर आधारित असेल. त्यानुसार महाविद्यालयीन ग्रंथपालांसाठी स्तर १०, वरिष्ठ श्रेणीतील ग्रंथपालांसाठी स्तर ११ व १२, तर निवड श्रेणीतील ग्रंथपालांसाठी स्तर १३ मधील वेतनरचना निश्चित करण्यात आली आहे. संबंधित ग्रंथपालांना १ जानेवारी २०१६ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीतील वेतनाची थकबाकी रोखीने अदा करण्यात येणार आहे. या थकबाकीपोटी एकूण १ कोटी ५२ लाख १९ हजार रुपयांच्या खर्चास शासनाने मान्यता दिली आहे. थकबाकीची रक्कम पुढील पाच वर्षांत समान हप्त्यांमध्ये देण्यात येणार आहे.
-०००-
(सामान्य प्रशासन विभाग)
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमात सुधारणांना मान्यता
दिरंगाईसाठी दंडाची तरतूद, आयुक्तांना दंडात्मक कारवाईचे अधिकार
नागरिकांना वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने लोकसेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अधिक प्रभावी करण्यासाठी त्यामध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
या सुधारणेनुसार सेवा देण्यात दिरंगाई झाल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारीही निश्चित केली जाणार आहे. नागरिकांना प्रथम, द्वितीय व तृतीय अपील प्रक्रियेची संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आतापर्यंत अधिसूचित न झालेल्या सेवांबाबत आयोगामार्फत शासनाला शिफारस करता येईल. ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर केलेल्या अर्जदारांना सेवा वेळेत न मिळाल्यास त्यांच्या संमतीने स्वयं-अपील (Auto Appeal) यंत्रणा कार्यान्वित होईल, अशी व्यवस्था असणार आहे.
याशिवाय प्रथम व द्वितीय अपील निकाली काढण्यासाठी कालमर्यादेचे पालन बंधनकारक होणार आहे. विनाकारण दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर व अपील प्राधिकाऱ्यांवर २५ हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. मुख्य आयुक्त व आयुक्त यांना स्वाधिकारे चौकशी व दंडात्मक कारवाईचे अधिकार देणे, अभिलेख व माहिती मागविणे तसेच आयोगाच्या आदेशांचे पुनर्विलोकन करण्याची तरतूदही समाविष्ट आहे.
याशिवाय, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना लोकसेवा पुरविणारी कार्यालये आणि अपील प्राधिकाऱ्यांच्या कार्यालयांची तपासणी करण्याचे अधिकार देण्यात येणार आहेत. या सुधारणा विधेयकात मुख्य आयुक्त व आयुक्तांची कमाल वयोमर्यादा ६५ वर्षांवरून ६७ वर्षे करण्याची तरतूद प्रस्तावित केली आहे.
या सुधारणांमुळे नागरिकांचे लोकसेवा मिळविण्याचे अधिकार अधिक बळकट होणार आहेत. प्रशासनात पारदर्शकता, कार्यक्षमता, शिस्त आणि उत्तरदायित्व वाढण्यास मदत होणार आहे. हे पाऊल नागरिकाभिमुख आणि गतिमान प्रशासनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
-०००-
(महसूल विभाग)
मौदा नगर पंचायतीस प्रशासकीय इमारतीसाठी जमीन
नागपूर जिल्ह्यातील मौदा नगर पंचायतीस प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ०.३८ हेक्टर जमीन देण्याच्या निर्णयास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. ही जमीन भोगवटादार वर्ग-२ या धारणाधिकाराने वर्ग होईल.
मौजा मौदा येथील सर्व्हे क्रमांक ४५० मधील आराजी ०.३८ हेक्टर शासकीय जमीन नगर पंचायतीकडे प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी देण्यात येणार आहे. जमीन ज्या कारणासाठी देण्यात आली आहे, त्याच कारणासाठी तिचा वापर करावा लागणार आहे. तसेच महसूल विभागाच्या पूर्वपरवानगीशिवाय पोटविभाजनही करता येणार नाही. ताबा मिळाल्यापासून तीन वर्षांत बांधकामास सुरुवात करणे बंधनकारक राहील, यासह अटी व शर्तींच्या आधारे जमीन देण्यात आली आहे.
००००००००

WhatsApp