
मुंबई, दि. २५ : जपानमधील ओकायामा प्रांताचे राज्यपाल श्री. रयुता इबारागी आणि ओकायामा प्रांतीय विधानसभेचे अध्यक्ष श्री. मसाताका ओटा यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळाने महाराष्ट्र विधानसभेचे माननीय अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी माननीय विधानसभा अध्यक्षांनी शिष्टमंडळाचे स्वागत करून या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला. महाराष्ट्र आणि जपान यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी संसदीय आदान-प्रदान, आर्थिक सहकार्य, सांस्कृतिक देवाणघेवाण तसेच परस्परांमधील जनसंपर्क वाढविण्यात यावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताने व्यक्त केली.

या शिष्टमंडळामध्ये ओकायामा प्रांतीय शासनाचे वरिष्ठ अधिकारी, ओकायामा प्रांतीय विधानसभेचे सदस्य, ओकायामा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे पदाधिकारी तसेच जपानमधील विविध उद्योग व व्यावसायिक क्षेत्रांतील प्रतिनिधींचा समावेश होता. यावेळी मुंबई येथील जपानच्या महावाणिज्यदूत श्रीमती हितोमी सातो आणि उप-वाणिज्यदूत तथा राजकीय विभागाचे प्रमुख श्री. यो निशिओ हे देखील उपस्थित होते. तसेच इंडो-जपान बिझनेस कौन्सिल आणि असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ जपानचे प्रतिनिधीही या प्रसंगी उपस्थित होते. या भेटीदरम्यान भारत आणि जपान यांच्यातील दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंध तसेच दोन्ही देशांमधील सहकार्याच्या वाढत्या संधींवर चर्चा करण्यात आली. विशेषतः महाराष्ट्र आणि ओकायामा प्रांत यांच्यातील संस्थात्मक संबंध अधिक दृढ करण्याबरोबरच व्यापार व गुंतवणूक, औद्योगिक विकास, तंत्रज्ञान, शिक्षण, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नव्या संधी निर्माण करण्यावर भर देण्यात आला.
भारताच्या औद्योगिक आणि पायाभूत सुविधा विकासामध्ये जपान महत्त्वाचा भागीदार राहिला आहे. जपानची गुंतवणूक, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि औद्योगिक कौशल्य यांचा भारतातील विविध विकास प्रकल्पांना मोठा लाभ झाला आहे. महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे औद्योगिक व आर्थिक केंद्र असल्याने जपानी उद्योगांसाठी वाहन उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स, उत्पादन क्षेत्र, पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा आणि आधुनिक तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. भारत आणि जपान यांच्यातील सहकार्य अधिक व्यापक करण्यासाठी राज्यस्तरीय आणि प्रांतीय स्तरावरील संबंध दृढ करण्याचे महत्त्वही यावेळी अधोरेखित करण्यात आले. भारत आणि जपान यांच्यात २८ एप्रिल १९५२ रोजी राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले असून, सन २०२७ मध्ये दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक टप्प्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांतील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि सहकार्याची नवी क्षेत्रे विकसित करण्यासाठी ही भेट महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
0000

WhatsApp