
मुंबई, दि. २६ : उरमोडी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून पुनर्वसनाशी संबंधित प्रश्नांना गती द्यावी. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न व मागण्यांकडे संवेदनशीलतेने पाहून त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाने अधिक सकारात्मक भूमिका घ्यावी, अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिल्या.
सातारा जिल्ह्यातील उरमोडी प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांबाबत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील (दूरदृश्य प्रणालीद्वारे) यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील म्हणाले, प्रकल्पग्रस्तांच्या प्रत्येक विषयाकडे प्रशासनाने सकारात्मक भूमिकेतून पाहावे. प्रत्येक प्रकरणाची वस्तुस्थिती तपासून पात्र प्रकल्पग्रस्तांना शासनाच्या नियमांनुसार न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. यासाठी संबंधित विभागांनी आपापसातील समन्वय वाढवावा. प्रलंबित प्रकरणांचा प्राधान्यक्रम निश्चित करून त्यावर कालमर्यादेत कार्यवाही करावी. मंत्री जाधव-पाटील म्हणाले, कोणत्याही तांत्रिक किंवा प्रशासकीय अडचणी असल्यास त्या वरिष्ठ स्तरावर निदर्शनास आणून द्याव्यात. या समस्यांचे वरिष्ठ स्तरावरून निराकरण करण्यासाठी आवश्यक मदत केली जाईल.
०००००
एकनाथ पोवार/विसंअ

WhatsApp