मुंबई, दि. २९ : धुळे जिल्हातील देवपूर येथील हरिजन सेवक संघ संचलित राजेंद्र छात्रालय वसतिगृह परिसरात प्रस्तावित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ग्रंथालयाच्या प्रकल्पातील तांत्रिक अडचणी दूर करून सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.
मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ग्रंथालयाच्या उर्वरित इमारतीच्या बांधकामासंदर्भात झालेल्या बैठकीत सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, सहसचिव सोमनाथ बागुल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सामजिक न्याय मंत्री शिरसाट म्हणाले, यापूर्वी हा प्रकल्प एका विशिष्ट योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आला होता. मात्र, त्या योजनेची मुदत संपुष्टात आल्याने उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी काही तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अडचणींवर आवश्यक तोडगा काढून सुधारित प्रस्ताव सादर करण्यात यावा, त्यानंतर शासन स्तरावर सकारात्मक निर्णय घेऊन प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे जतन आणि प्रसार करणारे हे स्मारक व ग्रंथालय सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असून, प्रकल्पाची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मूल्ये लक्षात घेऊन त्याचे काम मार्गी लावण्यास शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले. संबंधित विभागाने नियमानुसार आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
0000
जयश्री कोल्हे/ससं


















WhatsApp