शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देतानाच त्यांना पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ राबविली आहे. यामुळे पात्र शेतकऱ्यांना थकीत कृषी कर्जाच्या समस्येतून बाहेर पडण्याची संधी उपलब्ध होणार असून, भविष्यात नियमित कर्जव्यवहारासाठीही पोषक वातावरण निर्माण होणार आहे.
शेती हा निसर्गावर अवलंबून असलेला व्यवसाय असल्यामुळे अनेकदा अवकाळी पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, बाजारभावातील चढ-उतार किंवा इतर नैसर्गिक कारणांमुळे शेतकऱ्यांना कर्जाची वेळेवर परतफेड करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत थकीत कर्जाचा भार वाढत जातो. या पार्श्वभूमीवर पात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने ही योजना अमलात आणली आहे.
या योजनेत निश्चित निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या कृषी कर्जदारांचा समावेश करण्यात येणार आहे. अल्पमुदतीच्या पीक कर्जांसह योजनेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पुनर्गठित कृषी कर्जांचाही विचार करण्यात आला आहे. मात्र, लाभासाठी शासनाने निश्चित केलेल्या अटी व निकषांची पूर्तता आवश्यक राहणार आहे.
योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लाभार्थ्यांची माहिती अचूक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कर्ज खाते, आधार क्रमांकाशी संबंधित माहिती, बँकेतील तपशील तसेच इतर आवश्यक नोंदी अद्ययावत असल्यास पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याशी संबंधित माहितीमध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.
कर्जमुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी माहितीची डिजिटल पडताळणी, बँकांकडून आवश्यक माहितीची अचूक नोंद आणि विविध स्तरांवरील तपासणी यांना महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ योग्य पद्धतीने पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
या प्रक्रियेत सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका आणि संबंधित शासकीय यंत्रणा यांच्यात समन्वय ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर अचूक माहितीची देवाणघेवाण आणि वेळेत कार्यवाही होणे अपेक्षित आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याची माहिती नियमितपणे तपासावी, आवश्यक असल्यास संबंधित बँक किंवा संस्थेशी संपर्क साधावा आणि आवश्यक माहिती वेळेत उपलब्ध करून द्यावी. चुकीची अथवा अपूर्ण माहितीमुळे लाभ मिळण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे अचूक माहिती देणे ही प्रत्येक लाभार्थ्याची जबाबदारी आहे.
ही योजना केवळ थकीत कर्जातून दिलासा देणारी नसून शेतकऱ्यांना नव्याने आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल करण्याची संधी देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. पात्र शेतकऱ्यांनी योजनेच्या निकषांची माहिती करून घेत आवश्यक कार्यवाही वेळेत केल्यास या योजनेचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळू शकतो.
०००
- जिल्हा माहिती कार्यालय, बुलढाणा



















WhatsApp