सोलापूर जिल्ह्यातील स्मार्ट प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण करा – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

सोलापूर जिल्ह्यातील स्मार्ट प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण करा – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
- Advertisement -


मुंबई, दि. १४ : सोलापूर जिल्ह्यातील मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत सुरू असलेले सर्व उपप्रकल्प विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रभावी नियोजन करावे. तसेच प्रकल्प राबविताना शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ) आणि शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींवर तातडीने तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

सोलापूर जिल्ह्यातील स्मार्ट प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी कृषिमंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार उत्तमराव जानकर, कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाचे प्रकल्प संचालक प्रदीप चंद्रन,कृषी विभागाचे उपसचिव गणेश कचरे तसेच सोलापूर सोलापूर जिल्ह्यात स्मार्ट प्रकल्पांतर्गत एकूण २५ समुदाय आधारित संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कृषिमंत्री भरणे म्हणाले की, या प्रकल्पांच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब होऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करावा. प्रलंबित बांधकामे, यंत्रसामग्रीची उभारणी, लेखापरीक्षण, अनुदान वितरण आणि विविध मंजुरींची प्रक्रिया गतीने पूर्णकरा. शेतकरी उत्पादक कंपन्यांना भेडसावणाऱ्या तांत्रिक, प्रशासकीय आणि आर्थिक अडचणी तातडीने सोडवून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. या कामाची सद्यस्थिती आणि आढावा पुन्हा ३० जुलै रोजी घेण्यात येईल अशा सूचना त्यांनी केल्या.

बैठकीत विविध उपप्रकल्पांची सद्यस्थिती, प्रलंबित कामे, लेखापरीक्षण, अनुदान वितरण तसेच पुढील कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

स्मार्ट प्रकल्पाचे प्रकल्प संचालक प्रदीप चंद्रन यांनी सोलापूर जिल्ह्यात स्मार्ट प्रकल्पांतर्गत एकूण २५ समुदाय आधारित संस्थांच्या (सीबीओ) उपप्रकल्पांना अंतिम मंजुरी देण्यात आल्याची माहिती दिली. या उपप्रकल्पांची एकूण मंजूर किंमत ६४.१० कोटी रुपये असून, त्यासाठी ३८.४२ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. सर्व २५ संस्थांना प्रथम अनुदान हप्ता वितरित करण्यात आला असून, १४ संस्थांना द्वितीय, तर ४ संस्थांना तृतीय हप्ता वितरित करण्यात आला आहे. आतापर्यंत २६.३६ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले असून, त्यापैकी २०.८२ कोटी रुपये खर्च झाले आहेत. अनुदान, संस्थांचा स्वहिस्सा आणि कर्ज अशा मिळून ४१.९३ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. या संस्थांना प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनाकडून आवश्यक ती मदत देण्यात येत आहे अशी माहिती सादर केली.

0000

संध्या गरवारे/विसंअ

 



Source link

- Advertisement -