शिक्षण संवाद २०२६ च्या विचारमंथन सोहळ्यात शिक्षकांच्या अनुभवांना सर्वोच्च प्राधान्य – शिक्षणमंत्री दादाजी भुसे

शिक्षण संवाद २०२६ च्या विचारमंथन सोहळ्यात शिक्षकांच्या अनुभवांना सर्वोच्च प्राधान्य – शिक्षणमंत्री दादाजी भुसे
- Advertisement -


मुंबई, दि.२२ : राज्यातील शिक्षण व्यवस्थेला अधिक गुणवत्तापूर्ण, विद्यार्थीकेंद्रित आणि परिणामकारक बनविण्यासाठी शिक्षकांच्या प्रत्यक्ष अनुभवांना आणि सूचनांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. शालेय शिक्षण विभागाच्या वतीने चर्नी रोड येथे महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन येथे आयोजित शिक्षण संवाद २०२६ च्या विचारमंथन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाला शिक्षण आयुक्त सच्छिंद्रप्रताप सिंह, जवाहर बालभवनच्या संचालक नीता पाटील यासह राज्यातील शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध तज्ज्ञ यावेळी उपस्थित होते.

मंत्री भुसे म्हणाले, आम्हाला तुमचे अनुभव, अडचणी आणि सूचना ऐकायच्या आहेत. वर्गखोलीत काम करणाऱ्या शिक्षकांचा अनुभव हा शिक्षण विभागासाठी सर्वात मौल्यवान मार्गदर्शक आहे. या अनुभवांच्या आधारेच भविष्यातील धोरणे अधिक सक्षम आणि परिणामकारक केली जातील.”शिक्षण हे केवळ ज्ञान देण्याचे माध्यम नसून सुसंस्कारित,जबाबदार आणि राष्ट्रप्रेमी नागरिक घडविण्याचे प्रभावी साधन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेचा उल्लेख केला. बालपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय मूल्ये रुजविण्यावर शिक्षण व्यवस्थेने भर दिला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री भुसे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासन विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण व्यवस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून, शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येतील. विचारमंथनातील सर्व सकारात्मक सूचना आणि शिफारसींचा गांभीर्याने विचार करून त्यांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येईल. शिक्षकांच्या सहभागातूनच राज्याची शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि भविष्याभिमुख बनविण्याचा शिक्षण विभागाचा संकल्प आहे, असे आश्वासन शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिले.

कार्यशाळेत दिवसभर शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांच्या चर्चासत्रांचे आयोजन

‘अध्ययन-अध्यापनातील प्रयोग आणि शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन’ या विषयावरील पहिल्या सत्रात उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे आणि सचिन उषा विलास जोशी मार्गदर्शन केले. ‘शालेय स्तरावर योग आणि अध्यात्म’ या विषयावरील दुसऱ्या सत्रात ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज झगरे, पल्लवी आचार्य काटेकर आणि पद्मश्री उदय देशपांडे यांचे व्याख्यान पार पडले. ‘शालेय स्तरावर सैनिकी शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी’ या विषयावरील तिसऱ्या सत्रात सैनिक कल्याण विभागाचे उपसंचालक लेफ्टनंट कर्नल सतेश देवानराव हंगे (नि.) आणि एअर व्हेटरन विंग कमांडर एम. याग्नारामन यांनी  मार्गदर्शन केले. ‘शालेय स्तरावर कला, क्रीडा आणि अभिनय उपक्रम’ या विषयावर प्रसिद्ध लेखक संजय कळमकर आणि बालनाट्यकार राजीव तुलालवार यांचे विचार मांडले. त्यानंतर ‘शालेय स्तरावर राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी’ या विषयावर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे उपसंचालक संजय डोलीकर यांनी मार्गदर्शन केले. ‘शासकीय योजना : सद्यस्थिती, आव्हाने व संधी’ या विषयावर उपसंचालक (योजना) डॉ. वंदना वाहूळ आणि प्राथमिक शिक्षण परिषदेचे उपसंचालक संजय डोलीकर विविध योजनांची सद्यस्थिती, अंमलबजावणीतील आव्हाने आणि भविष्यातील संधी याविषयी सविस्तर माहिती दिली.

0000

संध्या गरवारे/विसंअ

 



Source link

- Advertisement -