नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार – पालकमंत्री हसन मुश्रीफ

- Advertisement -


  • प्रलंबित बदल अहवाल व वादांचा जलद, पारदर्शक निपटारा करण्याचे आवाहन

नंदुरबार, दिनांक १४ ऑगस्ट (जिमाका वृत्त) : नंदुरबार हा स्वतंत्र जिल्हा असून, जिल्ह्यात सार्वजनिक न्यास, शैक्षणिक संस्था आणि धर्मादाय रुग्णालयांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करून हे कार्यालय नियमित व स्वतंत्रपणे कार्यरत करण्यासाठी विधि व न्याय विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाच्या विधि व न्याय विभागांतर्गत नंदुरबार येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या सुमारे ₹12 कोटी 60 लाख खर्चाच्या नूतन शासकीय इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. खासदार ॲड. गोवाल पाडवी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला नंदुरबार जिल्ह्याच्या प्रशासकीय पायाभूत सुविधांमध्ये भर घालणाऱ्या या इमारतीचे भूमिपूजन होत असल्याबद्दल पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी आनंद व्यक्त केला.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, सध्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांसाठी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाची संयुक्त व्यवस्था आहे. नंदुरबारमध्ये मर्यादित दिवस कामकाज उपलब्ध असल्यामुळे सार्वजनिक न्यासांचे विश्वस्त, पदाधिकारी आणि वकिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. नूतन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नंदुरबारसाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करून हे कार्यालय इतर शासकीय कार्यालयांप्रमाणे नियमितपणे सुरू राहील, यासाठी विधि व न्याय विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल.

जिल्ह्यात शैक्षणिक संस्था, सार्वजनिक न्यास, धर्मादाय संस्था आणि धर्मादाय रुग्णालयांची संख्या वाढत आहे. या संस्थांशी संबंधित वाद आणि प्रकरणांचा जलदगतीने निपटारा होणे आवश्यक आहे. काही ठिकाणी बदल अहवाल अर्थात ‘चेंज रिपोर्ट’ सात ते आठ वर्षे प्रलंबित राहत असल्याचे निदर्शनास येते. अशा विलंबामुळे संस्थांमधील वाद अधिक वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे बदल अहवालांवर निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळेत निर्णय घेण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

“ही इमारत केवळ सिमेंट-विटांची वास्तू न राहता पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख कारभाराचे केंद्र ठरली पाहिजे. सार्वजनिक व धर्मादाय संस्था चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी तसेच विश्वस्तांमधील वाद न वाढता ते वेळेत सोडविण्यासाठी या कार्यालयाची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे,” असे पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी नमूद केले.

नूतन इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक निधी वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री म्हणून आपण स्वतः पाठपुरावा करू. सार्वजनिक बांधकाम विभागानेही इमारतीचे काम दर्जेदार पद्धतीने आणि नियोजित कालावधीत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. नंदुरबारचे स्वतंत्र सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय लवकरात लवकर सुरू व्हावे, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

टोकरतलाव रोडवरील दूध भवनाशेजारी सर्व्हे क्रमांक 414 येथील नियोजित जागेवर हा भूमिपूजन सोहळा पार पडला. नूतन इमारतीमुळे सार्वजनिक न्यासांच्या नोंदणीसह संबंधित प्रशासकीय कामकाजासाठी स्वतंत्र आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील न्यासांचे विश्वस्त, पदाधिकारी, वकील आणि नागरिकांना अधिक सुलभ व गतिमान सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

यावेळी विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी, किशोर दराडे, विधानसभा सदस्य राजेश पाडवी, आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा पोलीस अधिक्षक अश्विनी सानप, धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती, धर्मादाय सहआयुक्त विवेक सोनुने यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, वकील, नागरिक आणि पत्रकार उपस्थित होते.

0000000000



Source link

- Advertisement -