सामान्य नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

- Advertisement -


कोल्हापूर दि :15 (जिमाका) – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उद्घाटन तसेच ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील उपजिल्हा रुग्णालय आणि खर्डी येथील ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाले. यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत नव्याने उभारण्यात आलेल्या 44 प्राथमिक आरोग्य व 74 शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचा समावेश आहे.  राज्यातील सामान्य नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले ,आज या आरोग्य संस्थेचे लोकार्पण होत आहे हा आरोग्य सेवेसाठी अत्यंत गौरवपूर्ण व अभिमानास्पद क्षण आहे. राज्याला तज्ज्ञ डॉक्टर देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर कंत्राटी कामगारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे. शासनाने कॅशलेस उपचारांची सुविधा सुरू केली.

पालकमंत्री आबिटकर म्हणाले, आज 124 आरोग्य संस्थांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होतो आहे. हा आरोग्य विभागाच्या दृष्टीने अत्यंत संस्मरणीच क्षण आहे.वैद्यकीय यंत्रसामग्रीअभावी अनेक रुग्णालये बंद होती ती कार्यरत करण्यात आली आहेत. ग्रामीण भागातील पीएससी लेवलला महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्यान्वित करण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न सुरू आहे. राज्यातील गरीब रुग्ण पैशाअभावी उपचारांपासून वंचित राहू नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे . खाजगी हॉस्पिटलच्या धर्तीवर राज्याच्या आरोग्य विभागाला अद्ययावत करण्याला आपले प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा संदेश सादर करण्यात आला .

प्रारंभी आरोग्य सेवा तथा अभियान संचालक (राआअ) मुंबई संजय काटकर यांनी प्रास्ताविक केले. ऑनलाईन पद्धतीने आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर,वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल आमदार सर्वश्री किसन कथोरे , ज्ञानेश्वर म्हात्रे , दौलत दरोडा,शरद सोनवणे,प्रकाश सोळंके,विनोद निकोले,आरोग्य विभागाचे प्रधान सचिव निपुण विनायक आदी सहभागी झाले होते.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते महा पल्स-ए आय प्रकल्पाच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी कृत्रिम बुद्धीवर आधारित-जिल्हा आरोग्य कमांड सेंटरच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील 104 शासकीय आरोग्य संस्था,जिल्हा रुग्णालये , उप जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये तसेच 82 प्राथमिक आरोग्य केंद्रे एकाच डिजिटल व्यासपीठावर जोडली जाणार असून या कमांड सेंटरद्वारे एकाच छताखाली नागरिकांना सर्व सुविधा मोफत उपलब्ध होणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या यशस्वी अंमलबजावणी नंतर आरोग्य विभागातर्फे हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे.भारतीय तंत्रज्ञान संस्था आयआयटी-मंडी यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे .

यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ.दिलीप माने , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सरिता थोरात,सहा. संचालक डॉ.संजय रणवीर आदी उपस्थित होते. (प्राथमिक) आरोग्य सेवा – मुंबई येथील संचालक डॉ.विजय कंदेवाड यांनी आभार मानले.



Source link

- Advertisement -